ख्राईस्टचर्च : आपल्या कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळत असलेला न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्युलमने केवळ ५४ चेंडूंना सामोरे जाताना शतक ठोकून कसोटी क्रिकेटमधील सर्वांत वेगवान शतक ठोकण्याचा विंडीजचा दिग्गज फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स व पाकिस्तानचा मिस्बाह-उल्-हक यांचा विक्रम मोडला. आपला १०१वा आणि कारकिर्दीतील अखेरचा कसोटी सामना खेळत असलेला न्यूझीलंडचा कर्णधार मॅक्युलम याने आॅस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात शनिवारी पहिल्या दिवशी केवळ ५४ चेंडूंमध्ये शतकी खेळी साकारली. त्याने ७९ चेंडूंना सामोरे जाताना २१ चौकार व ६ षटकारांच्या मदतीने १४५ धावांची विक्रमी खेळी केली. रिचर्ड्सने इंग्लंडविरुद्ध सेंट जोन्स येथे १९८५-८६मध्ये ५६ चेंडूंमध्ये शतक आणि मिस्बाहने २०१४-१५मध्ये अबुधाबी येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध ५६ चेंडूंमध्ये केलेला शतकी खेळी साकारण्याचा विक्रम मॅक्युलमने शनिवारी मोडला.दुसऱ्या कसोटी सामन्यात उपाहारानंतर मॅक्युलमने केवळ ५४ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या शतकी खेळीत ६ षटकार व २१ चौकारांचा समावेश आहे. दरम्यान, मॅक्युलमने कसोटी क्रिकेट कारकिर्दीत सर्वांत अधिक षटकार ठोकण्याचा विक्रम नोंदवला. हा विक्रम यापूर्वी आॅस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्टच्या नावावर होता. गिलख्रिस्टने ९६ कसोटी सामन्यांत १०० षटकार ठोकले, तर मॅक्युलमने १०१ कसोटी सामन्यांत १०६ षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे.मॅक्युलमने सर रिचर्ड्स याचा विक्रम मोडल्यामुळे निराशा व्यक्त केली. मॅक्युलम म्हणाला, ‘‘सर रिचर्ड्स क्रिकेटमध्ये माझा आदर्श आहे. ते सार्वकालिक पसंतीचे खेळाडू आहेत. मी माझ्या फलंदाजीचा पूर्ण आनंद घेतला; पण रिचर्ड्स यांचा विक्रम मोडल्यामुळे निराश झालो.’’ मॅक्युलम ज्या वेळी फलंदाजीसाठी आला, त्या वेळी न्यूझीलंड संघ ३ बाद ३२ असा संघर्ष करीत होता. प्रतिकूल परिस्थितीमध्ये मॅक्युलमने संस्मरणीय खेळी केल्यामुळे न्यूझीलंडला पहिल्या डावात ३७० धावांची दमदार मजल मारता आली. (वृत्तसंस्था)धावफलक : पहिला डाव : न्यूझीलंड सर्व बाद ३७०; मार्टिन गुप्तील १८, ब्रँडन मॅक्युलम १४५, कोरे अँडरसन ७२, बी. जे. वॅटलिंग ५८, गोलंदाजी : जोश हेजलवूड २/९८, जेम्स पॅटिन्सन २/८१, नॅथन लायन ३/६१. आॅस्ट्रेलिया : १ बाद ५७ : डेव्हिड वॉर्नर १२, उस्मान ख्वाजा खेळत आहे १८, जो बर्न्स खेळत आहे २७. गोलंदाजी ट्रेंट बोल्ट १/१८.मॅक्युलमचे विक्रमी शतककर्णधार ब्रँडन मॅक्युलमने आपल्या कारकिर्दीतील अखेरची लढत संस्मरणीय ठरवली. शनिवारपासून आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मॅक्युलमने १४५ धावांची खेळी करताना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान शतक झळकावण्याचा पराक्रम केला. न्यूझीलंडने पहिल्या डावात ३७० धावांची दमदार मजल मारली.
मॅक्युलम तळपला
By admin | Published: February 21, 2016 12:47 AM