नवी दिल्ली - विश्व चॅम्पियन भारतीय भारोत्तोलक मीराबाई चानूने कमरेच्या दुखापतीनंतर जबरदस्त पुनरागमन करताना गुरूवारी थायलंडमध्ये इजीएटी कपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. या दुखापतीमुळे चानू २०१८ मध्ये सहा महिन्यांपासून अधिक वेळ विविध स्पर्धांपासून दूर राहिली होती.मिळालेल्या माहितीनुसार चानू हीने ४८ किलो गटात १९२ किलो वजन उचलून सिल्व्हर लेव्हल आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्ण मिळवले आहे. टोकियो २०२० आॅलिम्पिकच्या अंतिम रँकिंगच्या कटसाठी या स्पर्धेतील गुण महत्त्वपूर्ण ठरतील. चानूने स्नॅचमध्ये ८२ किलो व क्लिन अॅण्ड जर्कमध्ये ११० किलो वजन उलचून अव्वल स्थान मिळवले. दुखापतीतून सावरण्यासाठी तिला विस्तृत फिजीओथेरपी करावी लागली. चानू ही दुखापतीमुळे गेल्या वर्षी विश्व चॅम्पियनशीपमध्ये सहभागी होऊ शकली नव्हती. ही स्पर्धा गोल्ड लेव्हल आॅलिम्पिक पात्रता आहे. तिला दुखापतीमुळे जकार्तामध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेतही सहभागी होता आले नव्हते.आता मी पूर्ण तंदुरुस्त असल्याचे अनुभव घेत आहे. मात्र, पुनरागमन करत असल्याने मी माझी सर्वोत्तम कामगिरी करु शकले नाही. तरी मी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीच्या तुलनेत केवळ चार किलो वजन कमी उचलले. त्यामुळे मी समाधानी आहे. आता मी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी तयारी करणार असून यानंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी सज्ज व्हायचे आहे.- मीराबाई चानू
मीराबाई चानूचे ‘सुवर्ण’ पुनरागमन, थायलंड इजीएटी कपमध्ये मिळवले जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 4:25 AM