मॉस्कोः रिअल माद्रिदचा रिअल हिरो, पोर्तुगालचा फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो कायमच चर्चेत असतो. फुटबॉल वर्ल्ड कप दहा दिवसांवर आला असल्यानं चाहत्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या आहेतच, पण त्याच्या दोन बॉडीगार्ड्सनीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय.
चॅम्पियन्स लीगच्या सामन्यांदरम्यान नुनो मारेकॉस आणि गॉनकालो सालगाडो या जोडीचं सुरक्षाकवच रोनाल्डोभोवती पाहायला मिळालं. इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांनी जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर रोनाल्डोनं आपल्या सुरक्षेत वाढ केली आहे. तेव्हापासून, ही धाकड जोडी त्याच्या अवतीभवती घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर बारीक लक्ष ठेवून असते.
गॉनकालो सालगाडो हा मिक्स्ड मार्शल आर्ट्समधील रांगडा गडी आहे. त्याची देहयष्टी पाहूनच समोरचा माणूस बिचकतो, क्षणभर थबकतो. त्यामुळे रोनाल्डो निश्चिंतपणे फिरू शकतो.
नुनो मारेकॉसची उंची ६ फूट २ इंच, फिटनेसला तोड नाही. स्पेनमधील थरारक बुल फाइट गेममध्ये तो फायटर आहे. आठ जणांच्या टीममध्ये तो सगळ्यात पुढे असतो. साधारण ५००-६०० किलो वजनाच्या बैलाला डिवचायचं आणि आपल्यावर हल्ला करायला भाग पाडायचं, हे त्याचं काम. त्यानंतर त्या बैलाशी जिगरबाजपणे लढून तो त्याला लोळवतो. एवढी धमक असलेला नुनो शेजारी असताना रोनाल्डो कशाला कुठल्या धमकीला भीक घालतोय?
रशियातील फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तो बिनधास्त उतरणार आहे आणि आपल्या चाहत्यांना खूश करण्यासाठी झोकून देणार आहे.