ऑनलाइन लोकमत
रिओ, दि. 14 - महिलांपाठोपाठ भारतीय पुरुष हॉकी संघालाही ऑलिम्पिकमधून काढता पाय घ्यावा लागला आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात त्यांना बेल्जियमकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतीय संघाकडून मोठ्या अपेक्षा असतानाच ढिसाळ बचावाने सगळ्यांचाच भ्रमनिरास केला. गोल नोंदवून सुरुवात करणाऱ्या भारतीयांना विश्रांतीपर्यंत आघाडी टिकवली. पण चेंडूवर ताबा राखण्यात बेल्जियमने बाजी मारली होती. बेल्जियमच्या प्रतिआक्रमणाने भारतीय खेळाडू संभ्रमात पडले होते. त्यांनी सातत्याने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या आणि त्यातील तीन संधी साधत भारतीयांच्या तमाम चाहत्यांचा हिरमोड केला. सामन्याच्या 33व्या मिनिटाला प्रथम डॉकिएर सेबॅस्टियन याने गोल केला. त्यानंतर 44व्या मिनिटाला त्यानेच बेल्जियमला आघाडीवर नेले आणि पाच मिनिटांनी बून टॉम याने विजय निश्चित करणारा गोल केला. श्रीजेशचा भक्कम बचाव देखील कामी आला नाही. बेल्जियमचा बचाव इतका अचूक होता की भारताला एकही कॉर्नर मिळवता आला नाही. मैदानी गोल करण्याच्या देखील केवळ चारच संधी त्यांना निर्माण करता आल्या. त्या उलट बेल्जियमने तीन कॉर्नर वाया दवडल्यानंतरही मैदानी गोल करून त्याची भरपाई केली. सानिया-बोपण्णाही हरले टेनिसमध्ये मिश्र दुहेरीत पदक मिळविण्याच्या आशादेखील संपुष्टात आल्या. रोहन बोपण्णा आणि सानिया मिर्झा यांना चेक प्रजासत्ताकच्या ल्युसी ऱ्हाडेका आणि राडेक स्टेपानेक यांचा प्रतिकार करता न अाल्यानं त्यांना पराभवाला सामोर जावं लागलं आहे. वेगवान सर्व्हिस करणाऱ्या चेक जोडीने पहिलाच सेट 6-1 असा जिंकून भारतीय जोडीवर दडपण आणले. दुसऱ्या सेटमध्ये बोपण्णा-सानिया यांनी प्रतिकार केला खरा, पण ते प्रतिस्पर्ध्यांना रोखू शकले नाहीत. त्यांनी अखेरच्या क्षणी सर्व्हिस गमावली आणि चेक जोडीला सरळ सेटमध्ये विजय बहाल केला. चेक जोडीने अगदी सहज ही लढत 6-1, 7-5 अशी जिंकली.