ईस्ट रदरफोर्ड : अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीच्या कारकिर्दीचा अंत एका दु:खद आठवणीने झाला. सोमवारी अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पर्धेत अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर त्याने नाट्यमय घडामोडीत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली. क्लब लढतीत विक्रमांचे डोंगर रचणारा मेस्सी देशासाठी कोणतीही महत्त्वाची स्पर्धा जिंकून देण्यात अपयशी ठरला होता. यावरून त्याची मॅराडोनासह अनेक दिग्गजांनी निर्भर्त्सना केली होती. सोमवारच्या अंतिम सामन्यातही त्याची पुनरावृत्ती झाल्याने त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला रामराम केला.सोमवारी पहाटे झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्ये चिलीच्या गोलपोस्टचा वेध घेण्यात अपयशी ठरल्यानंतर निराश झालेल्या मेस्सीने निवृत्तीचा निर्णय घेतला. २०१४ पासून अर्जेंटिना संघाला प्रतिष्ठेच्या तीन स्पर्धांमध्ये अंतिम लढतीत पराभव स्वीकारावा लागला आहे. २००७ मध्ये कोपा अमेरिका स्पर्धेच्या अंतिम लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या अर्जेंटिना संघात मेस्सीचा समावेश होता. अवांतर वेळेत अर्जेंटिना व चिली संघ ०-० ने बरोबरीत होते. मेस्सी शूटआऊटमध्ये सुरुवातीचा फटका मारताना अपयशी ठरला. त्यामुळे तो निराश झाला. अर्जेंटिनाचा गोलकीपर सर्गियो रोमेरोने शूटआऊटमध्ये चिलीच्या सलामी फटक्यावर शानदार बचाव करीत चांगली सुरुवात केली, पण मेस्सीला गोल नोंदविता आला नाही. लुकास बिगिलिया गोल नोंदवण्यात अपयशी ठरल्यामुळे चिली संघाचा ४-२ ने विजय निश्चित झाला. या वेळी खेळली गेलेली अंतिम लढतही गेल्या वेळच्या अंतिम लढतीप्रमाणेच झाली. त्या वेळीही चिलीने गोलशून्यने बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाचा पराभव केला होता. अर्जेंटिनाला २०१४ च्या विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीत जर्मनीकडून १-० ने पराभव स्वीकारावा लागला होता. शानदार कारकीर्द आणि पाच वेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या मेस्सीला अनेकदा मायदेशातील चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले आहे. मेस्सीने थोड्या खडतर सत्रानंतर आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. गेल्या वर्षी दुखापतीने त्याला त्रस्त केले होते. दुखापतीतून सावरल्यांतर त्याने पुन्हा एकदा शानदार पुनरागमन करताना ला लीगामध्ये बार्सिलोना संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्याच्याकडून अर्जेंटिनाला कोपा अमेरिका स्पर्धेत जेतेपद पटकावून देण्याच्या अपेक्षा व्यक्त करण्यात येत होत्या.जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये गणल्या जाणाऱ्या मेस्सीला त्याच्याच देशाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाच्या विक्रमाची बरोबरी साधता आली नाही. मॅराडोनाने १९८६ मध्ये विश्वकप स्पर्धेत त्याच्या संघाला विजय मिळवून दिला होता. काही वेळा मॅराडोनाने मेस्सीवर टीका केली. युरो-२०१६ च्या सुरुवातीपूर्वी पॅरिसमध्ये मॅराडोनाने म्हटले होते, ‘‘मेस्सी चांगली व्यक्ती आहे, पण त्याच्याकडे ती प्रतिभा नाही. त्याच्यात नेतृत्व करण्याच्या स्वभावाची उणीव आहे.’’स्पर्धेपूर्वी होंडुरासविरुद्धच्या एका मैत्रीपूर्ण लढतीत खेळण्यासाठी मेस्सी स्पेनहून अर्जेंटिनामध्ये दाखल झाला होता. यावरून संघातर्फे खेळण्यासाठी तो किती उत्सुक आहे, याची प्रचिती आली. या लढतीत त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर तो स्पेनला परतला आणि कोपा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेत दाखल होत अर्जेंटिना संघासोबत जुळला. स्पर्धेच्या सुरुवातीला तो दुखापतग्रस्त होता, पण त्यानंतर त्याला सूर गवसला. पनामाविरुद्ध अर्जेंटिना संघाने मिळवलेल्या ५-० ने विजयात मेस्सीच्या हॅट््ट्रिकचे योगदान महत्त्वाचे ठरले. >लिओनेल मेस्सी अर्जेंटिनाचा सचिन तेंडुलकर भारतात क्रि केटमध्ये सचिन तेंडुलकरचे जे स्थान आहे. तेच स्थान फुटबॉलच्या जगात लिओनेल मेस्सीचे आहे. भारतात क्रि केट फक्त खेळ नसून एक धर्म आहे. अर्जेंटिनात फुटबॉलचीही तशीच स्थिती आहे. दोन्ही देशातील चाहत्यांना प्रतिस्पर्ध्यावर फक्त विजय हवा असतो. पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारण्याची फार कमी जणांची तयारी असते. क्रि केटमधल्या अिव्दतीय, अदभुत प्रतिभेमुळे नेहमीच सचिन तेंडुलकरकडून कोटयावधी भारतीयांच्या भरपूर अपेक्षा असायच्या. अनेकदा सचिन त्या अपेक्षांच्या ओङयाखाली दबून जायचा आण िमोक्याच्या क्षणी सर्वाधिक गरज असताना ढेपाळायचा.
मेस्सीचा अलविदा..!
By admin | Published: June 28, 2016 6:11 AM