लुसैल : हेन्री मार्टिन आणि लुई शावेज यांनी केलेल्या गोलच्या जोरावर मेक्सिकोने आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात सौदी अरबला नमवले. मात्र, यानंतरही विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करण्यात यश न आल्याने मेक्सिकोच्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले. बुधवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यात मेक्सिकोने सौदी अरबला २-१ असे नमवले.
याच गटातील अन्य सामन्यात अर्जेंटिनाने पोलंडवर २-० असा विजय मिळवल्याने गोल अंतर फरकाच्या जोरावर पोलंडने पराभवानंतरही बाद फेरी गाठली. १९७८ नंतर पहिल्यांदाच मेक्सिकोला विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश करता आला नाही. गेल्या सातही विश्वचषक स्पर्धांमध्ये मेक्सिकोने बाद फेरी गाठली होती. मेक्सिकोकडून मार्टिनने ४८व्या मिनिटाला, तर शावेजने ५२व्या मिनिटाला गोल करीत संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी मेक्सिकोने अखेरपर्यंत कायमही राखली. मात्र, अतिरिक्त वेळेत सालेम अल्दावसारीने एक गोल करीत सौदी अरबची पिछाडी १-२ अशी कमी केली.
१९७८ नंतर पहिल्यांदाच विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीतच मेक्सिकोचे आव्हान संपुष्टात. सहा वेळा विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या सौदी अरब संघाचे आव्हान पाचव्यांदा साखळी फेरीत संपुष्टात. मेक्सिकोने सौदी अरब संघाविरुद्धची अपराजित मालिका कायम राखली.