ऑनलाइन लोकमत -
रिओ दी जानेरो, दि. 12 - ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्कृष्ट अॅथलिट अमेरिकेच्या मायकल फेल्प्सला हरवणं कठीणच नाही तर अशक्य झालं आहे. एकीकडे भारत एका पदकाची आशा करत असताना मायकल फ्लेप्स मात्रने वैयक्तिक चार सुवर्णपदकांची कमाई केली आहे. 200 मी. वैयक्तिक मेडली प्रकारात बाजी मारत मायकल फेल्प्सने अजून एक सुवर्णपदक जिंकलं आहे. फेल्प्सच्या कारकीर्दीतलं 22वं सुवर्णपदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला आहे.
मायकल फ्लेप्सने सलग चौथ्या ऑलिम्पिकमध्ये 200 मी. वैयक्तिक मेडली प्रकारात बाजी मारली आहे. एकाच खेळात सलग चौथ्यांदा जिंकण्याचा विक्रम करणारा मायकल फ्लेप्स तिसरा खेळाडू ठरला आहे.
मायकल फेल्प्सने खेळाच्या या महाकुंभात आतापर्यंत एकूण 26 पदके आपल्या नावे केली आहेत. या पदकांत 22 गोल्डसह दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांचा समावेश आहे. 22 सुवर्णपदकांसह 26 पदकांची कमाई करणारा फेल्प्स हा जगातील पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. फेल्प्स हा पाचव्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाला आहे.
बिजींग ऑलिम्पिकमध्ये फेल्पसने एकूण आठ सुवर्णपदके मिळवली. लंडन ऑलिंम्पिकमध्ये चार सुवर्ण, दोन रौप्यपदके जिंकली. २००४ सालच्या ग्रीसमधील अथेन्स ऑलिम्पिकमध्ये एकूण आठ पदके मिळवली. त्यात सहा सुवर्णपदकांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे आजपर्यंत भारताने एकूण जितकी पदके मिळवलेली आहेत, तेवढी एकट्या मायकल फ्लेप्सने जिंकली आहेत.
भारताने आतापर्यंत मिळवलेल्या २६ पदकांमध्ये १५ पदके व्यक्तीगत आहेत आणि ११ पदके हॉकीमधील आहे. भारताला दहा सुवर्ण हॉकीमध्ये तर, अभिनव बिंद्राने २००८ बिजींग ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारतासाठी पहिले व्यक्तीगत सुवर्णपदक मिळवले होते.