बुलडाणा- पोलमंडमध्ये सुरू असलेल्या युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशीपमध्ये भारताच्या युवा खेळाडूंनी अमेरिकेच्या संघाला अतितटीच्या स्पर्धेत मात देत कंपाऊंड प्रकारात सुवर्ण वेध केला. यामध्ये बुलडाण्याच्या अवघ्या १६ वर्षाच्या मिहीर नितीन अपार याने त्याचे कौशल पणाला लावत हा सुवर्ण वेध घेण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.
९ ऑगस्टपासून पोलंडमध्ये युथ वर्ल्ड आर्चरी चॅम्पीयनशीप सुरू आहे. यामध्ये १४ ऑगस्ट रोजी मुलांच्या संघातील हरियाणाचा कुशल दलाल उत्तर प्रदेशच्या साहील चौधरी आणि बुलडाण्याच्या मिहीर नितीन अपार यांनी आपले कौशल्य पणाला लावत ‘सुवर्ण’ वेध घेत अमेरिकन संघाचा २३३ विरुद्ध २३१ अशा गुण फरकाने पराभव केला आहे. दरम्यान प्रारंभी मुलांच्याही संघाने अशाच पद्धतीने सुवर्ण वेध घेत भारतासाठी दुहेरी यश मिळविले आहे. मिहीर हा जिल्हा परिषद शाळेत शिक्षीका असलेल्या जया अपार आणि नितीन अपार यांचा मुलगा आहे.
मिहीर नितीन अपार त्याचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग यांच्या मार्गदर्शनात आर्चरीचे धडे घेत आहेत. त्याच्या रुपाने बुलडाण्याला आणखी एक जागतिक दर्जाचा खेळाडू मिळाला आहे. १४ ऑगस्ट रोजी भारतीय वेळेनुसार पोलंडमध्ये दुपारी २ वाजेच्या सुमारास झालेल्या या स्पर्धेत या युवा खेळाडूंनी हा सुवर्ण वेध घेतला असल्याची माहिती मिहीरचे वडील नितीन अपार यांनी दिली.