भारताचे दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांनी शनिवारी कोरोना व्हायरसवर मात केली आणि त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आलं होतं. परंतु त्यानंतर ते ऑक्सिजन सपोर्टवर होते. मिल्खा सिंग यांच्या कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. दरम्यान, गुरूवारी अचानक पुन्हा मिल्खा सिंग यांची तब्येत बिघडली. गुरूवारी दुपारी ऑक्सिजन लेव्हल अचानक कमी झाल्यानं त्यांना चंडिगढ येथील पीजीआयच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
पीजीआयचे प्रवक्ते प्रोफेसर अशोक कुमार यांनी निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली. "मिल्खा सिंग यांची ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यानंतर त्यांना कोविड रुग्णालयातील आयसीयू वॉर्डात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची प्रकृती स्थित आहे आणि त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे," असं अशोक कुमार म्हणाले.
गेल्या आठवड्यात सोमवारी मिल्खा सिंग यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. बुधवारी त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाल्याचे समोर आले आणि त्यांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. मिल्खा सिंग यांचा मुलगा व गोल्फपटू जीव शनिवारी दुबईहून चंडिगढ येथे दाखल झाला. त्यांची मुलगी मोना मिल्खा सिंग या अमेरिकेत डॉक्टर आहेत आणि काही दिवसांपूर्वी त्याची भारतात दाखल झाल्या आहेत.