नवी दिल्ली: भारताचे दिग्गज, महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी मिल्खा सिंग आणि त्यांच्या पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर मोहाली येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अखेर आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (milkha singh wife nirmal kaur passes away due to corona)
निर्मल मिल्खा सिंग यांच्या निधनाची बातमी कुटुंबीयांकडून देण्यात आली. आम्हाला सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, कोरोनाविरोधातील लढाईत निर्मल मिल्खा सिंग यांचे निधन झाले. निर्मल यांच्या निधनाबाबत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मिल्खा सिंग यांच्यावर अद्यापही रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
मिल्खा सिंग यांच्यावर उपचार सुरू
मिल्खा सिंग यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर ते कोरोनावर मात करून घरी परतले होते. परंतु, काही दिवसांनी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. देशाच्या महान खेळाडूची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्याबाबत अफवा पसरवू नका, असे आवाहन क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरुन संवाद साधून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. पंतप्रधान मोदी यांनी मिल्खा सिंग लवकर बरे व्हावेत, यासाठी प्रार्थना केली. याशिवाय मिल्खा सिंग लवकरच आजारातून मुक्त होऊन टोकिओ ऑलम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवतील, असेही मोदींनी म्हटले होते.