महेश चेमटे,मुंबईभारतीय क्रीडा संस्कृतीत मानाचे स्थान असलेल्या मल्लखांब या खेळाने आज भारतातच नव्हेतर विदेशातही स्वत:चा वेगळेपणा जपण्यात यश मिळवले आहे. मल्लखांबाची लोकप्रियता लक्षात घेऊन अलीकडेच जर्मन मल्लखांब महासंघाची स्थापना करण्यात आली. जर्मनीसह विविध देशांमध्ये मल्लखांब संघटना स्थापन करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मल्लखांबचे आयोजन करण्याचे शिवधनुष्य मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांनी पेलले आहे. जर्मनीसह फ्रान्स, इंग्लंड, दुबई, मलेशिया, स्पेन, माद्रिद, सिंगापूर, न्यू मेक्सिको, झेक रिपब्लिक, हाँगकाँग, इटली, मॉरिशस, रि युनायटेड आइसलँड या देशांमध्येही मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर करण्यासाठी सध्या निमंत्रणांचा ओढा वाढत आहे; शिवाय या देशांमध्येही मल्लखांबच्या संघटनांचे रोपटे रुजवले जात आहे. विशेष म्हणजे या देशांमध्ये देशपांडे गेल्या काही वर्षांपासून स्वत: प्रशिक्षण देत आहेत. याआधी अमेरिकेच्या न्यू जर्सी शहरात ‘मल्लखांब फेडरेशन आॅफ यूएसए’ची स्थापना करण्यात आली होती. अमेरिकेत मल्लखांबचा प्रचार आणि प्रसार करणे, त्याचबरोबर देशांतर्गत होणाऱ्या स्पर्धांसाठी पुरुष आणि महिला संघ तयार करून त्यांना प्रशिक्षण देणे या मुख्य उद्देशाने मल्लखांब महासंघ तेथे काम करत आहे; शिवाय शालेय स्तरावर व १८ वर्षांखालील मुला-मुलींना या खेळाचे महत्त्व समजावून त्यांना या खेळात करिअर बनवण्यासाठी मदत केली जात आहे. उदय देशपांडे यांनी विविध देशांमधील युवकांना मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले असून, ते सातत्याने त्यांच्या संपर्कात असतात. त्या प्रशिक्षणाचे फलित म्हणजे जर्मन मल्लखांब महासंघ. आता यापुढे आंतरराष्ट्रीय स्तरावर मल्लखांब स्पर्धा आयोजित करून भविष्यात आॅलिम्पिकमध्ये या खेळाच्या समावेशासाठी देशपांडे प्रयत्नशील आहेत.
विदेशात मल्लखांबची क्रेझ
By admin | Published: January 04, 2016 3:00 AM