अॅडिलेड : शुक्रवारी विश्वकप स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आॅस्ट्रेलियाविरुद्ध सहा विकेट््सनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक आणि अनुभवी शाहिद आफ्रिदी यांनी आंतरराष्ट्रीय वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. या दोन्ही खेळाडूंनी विश्वकप स्पर्धेपूर्वी वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याचे जाहीर केले होते. मिसबाह यापुढे कसोटी क्रिकेट खेळणार असून आफ्रिदी केवळ टी-२० क्रिकेट खेळणार आहे. ४० वर्षीय मिसबाहने १६२ वन-डे सामन्यांत प्रतिनिधित्व केले, पण त्याला शतकी खेळी करता आली नाही. मिसबाहने २००१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वन-डे क्रिकेटमध्ये त्याने ५१२२ धावा फटकाविल्या आहेत. १९९६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पणाच्या वन-डे मालिकेमध्ये केवळ ३७ चेंडूंमध्ये शतकी खेळी करीत चर्चेत आलेल्या आफ्रिदीमध्ये कुठल्याही गोलंदाजाविरुद्ध आक्रमक फलंदाजी करण्याची क्षमता होती. त्याने ३९८ वन-डे सामन्यांत ८०६४ धावा फटकावल्या आणि ३९५ विकेट घेतल्या. आफ्रिदीने २०११ च्या विश्वकप स्पर्धेत पाकिस्तान संघाचे कर्णधारपद भूषवले होते. त्यावेळी पाकिस्तान संघाला मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या उपांत्य लढतीत भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)३००३पाकिस्तान संघाच्या कर्णधार पदाच्या कार्यकाळात मिस्बाह-उल-हकने एकदिवसीय सामन्यात ३००३ धावांचा टप्पा पार केला. ३००० धावा पूर्ण करणारा मिस्बाह हा दुसरा पाकिस्तानी कर्णधार ठरला आहे. याआधी इम्रान खान याने कर्णधारपदाच्या कार्यकाळात ३२४७ धावा केल्या आहेत. जगातील १६ खेळांडूनी कर्णधारपद सांभाळताना ३०००च्या पुढे धावा केल्या आहेत. संपूर्ण स्पर्धेदरम्यान फलंदाजांनी सातत्य दाखविले नाही. मधल्या टप्प्यात संघाला सावरणारा एकही फलंदाज नाही. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवामागे खराब फलंदाजी हे कारण आहेच, पण संपूर्ण स्पर्धेदरम्यानही आम्ही वर्चस्वपूर्ण खेळ करू शकलो नाही, हे खेदजनक आहे.- मिस्बाह उल हक, कर्णधार पाक
मिसबाह, आफ्रिदीचा ‘वन-डे’ला अलविदा
By admin | Published: March 21, 2015 1:09 AM