ऑनलाइन टीम
कराची, दि. २१ - भारताने सगळ्या प्रकारच्या क्रिकेट सामन्यांमध्ये पाकिस्तानकडून पराभवाची चव चाखली आहे, परंतु आत्तापर्यंत एकदाही भारत वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झालेला नाही. पाकिस्तानच्या कर्णधाराला मिसबाह उल हकला हा इतिहास बदलायचा आहे. वर्ल्ड कपमध्ये भारताला हरवणं आणि इतिहास बदलणं हे आमच्यासमोरचं आव्हान असल्याचं मिसबाहनं म्हटलं आहे. पाकिस्तानचा माजी आक्रमक फलंदाज इंझमाम हुसेन याचीही इच्छा पाकिस्ताननं भारताला वर्ल्ड कपमध्ये धूळ चारावी अशीच आहे. १४ फेब्रुवारी रोजी वर्ल्डकपचं रणशिंग फुंकलं जाणार असून दुस-याच दिवशी म्हणजे १५ फेब्रुवारी रोजी रविवारी भारत पाकिस्तान या पारंपरिक शत्रूंमध्ये एकदिवसीय सामन्याची रणधुमाळी उडणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून कसोटी मालिकेत व नंतर ऑस्ट्रेलिया व इंग्लंड दोघांकडून एकदविसीय तिरंगी चषकामध्ये सपाटून मार खाल्लेला भारतीय संघ मानसिकदृष्ट्या खचलेला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात भारतीय संघाला कसून सराव करावा लागेल आणि पाकिस्तानविरोधातली वर्ल्डकपमधल्या विजयाची मालिका अबाधित राखण्यासाठी झगडावं लागेल.
केवळ भारताविरोधातलाच नव्हे तर वर्ल्ड कपमधला प्रत्येक सामना जिंकण्याचं उद्दिष्ट्य आम्ही ठेवलं असल्याचं मिसबाहचं म्हणणं आहे. आज म्हणजे बुधवारीच पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होत असून वर्ल्ड कपचा माहोल तयार होण्यास सुरुवात झालेली आहे.