दोहा : पहिल्या फेरीपासून राखलेले वर्चस्व अखेरपर्यंत कायम राखत झेक प्रजासत्ताकच्या याकूब वाडलेज याने दोहा डायमंड लीग स्पर्धेत भालाफेकीमध्ये भारताच्या नीरज चोप्राचे तगडे आव्हान परतावले. दखल घेण्याची बाब म्हणजे अखेरपर्यंत कडवी झुंज दिलेल्या नीरजला अव्वल स्थान पटकावण्यापासून अवघ्या २ सेंमी अंतराने अपयश आले.
याकूबची सर्वोत्तम फेक ८८.३८ मीटरची राहिली, तर नीरजला ८८.३६ मीटरच्या फेकीसह दुसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८६.६२ मीटरच्या फेकीसह तिसरे स्थान पटकावले. या स्पर्धेत सहभागी झालेला अन्य भारतीय ७६.३१ मीटरच्या अंतरासह नवव्या स्थानी राहिला.
नीरजचा पहिला प्रयत्न अवैध ठरला. मात्र, त्याने तिसऱ्या व चौथ्या प्रयत्नात अनुक्रमे ८६.२४ आणि ८६.१८ मीटरची फेक करत जबरदस्त पुनरागमन केले. त्याने तिसऱ्या फेरीपासून राखलेले दुसरे स्थान अखेरपर्यंत कायम राखले. तो याकूबला मागे टाकण्यात यश मिळवणार असे दिसत असतानाच याकूबने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ८८.३८ मीटरची जबरदस्त फेक केली. हीच फेक स्पर्धेतील सर्वोत्तम ठरली.