ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २९ - ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क वर्ल्डकप २०१५ मधील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला आहे. मिशेलने आठ सामन्यांमध्ये १०.१८ च्या सरासरीने २२ विकेट घेतल्या आहेत. तर मार्टीन गुप्टिल हा यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक म्हणजे ५४७ धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
वर्ल्डकपमधील आज अंतिम सामना पार पडल्यावर प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची घोषणा करण्यात आली. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी मिशेल स्टार्क, न्यूझीलंडचा गोलंदाज ट्रेंट बोल्ट, न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम, मार्टिन गुप्टिल, विश्वचषकात लागोपाठ चार शतकं ठोकणारा कुमार संगकारा हे खेळाडू प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पर्धेत होते. आयसीसीच्या समितीने मिशेल स्टार्क या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची प्लेयर ऑफ द टुर्नामेंट या पुरस्कारासाठी निवड केली. स्टार्कने ८ सामन्यात २२४ धाव देऊन २२ विकेट घेतल्या. ट्रेंट बॉल्टनेही ८ सामन्यात २२ विकेट घेतल्या होत्या. पण निवड समितीने स्टार्कला पसंती दिली.
यंदाच्या वर्ल्डकपचे वैशिष्ट्य
> मार्टीन गुप्टिलने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक ५४७ धावा केल्या. वर्ल्डकपमध्ये ५०० धावांचा टप्पा ओलांडणारा गुप्टिल न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे.
> वर्ल्डकप फायनलमध्ये खेळणा-या संघाच्या कर्णधाराने शून्यावर बाद होण्याची ही पहिलीच वेळ. न्यूझीलंडचा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम आज शून्यावर बाद झाला होता.
> ऑस्ट्रेलियाचा विकेट किपर ब्रँड हॅडीन वर्ल्डकप फायनलमध्ये खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू. हॅडिनचे वय ३७ वर्ष १५७ दिवस असे आहे.
> फायनलमधील पंच कुमार धर्मसेना असे पहिले पंच आहेत ज्यांनी वर्ल्डकप फायनलमध्ये पंच व खेळाडू म्हणून सहभागी झाले आहेत. १९९६ मध्ये लाहौर येथे पार पडलेल्या वर्ल्डकप फायनलमध्ये धर्मसेना यांनी स्टीव वॉची विकेट घेतली होती. १९९६ चा वर्ल्डकप श्रीलंकेने जिंकला होता.