ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 24 - भारतीय क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिला आपल्या संघाला आयसीसी महिला विश्वकप स्पर्धेत जेतेपद पटकावून देता आले नाही, मात्र, या स्टार महिला फलंदाजाची रविवारी संपलेल्या या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर आयसीसी पॅनलने निवडलेल्या आयसीसी महिला विश्वकप 2017 च्या संघाच्या कर्णधारपदी निवड केली आहे.
आयसीसीने सोमवारी 12 सदस्यांचा संघ जाहीर केला. त्यात उपांत्य फेरीत 171 धावांची शानदार खेळी करणारी अष्टपैलू हरमनप्रीत कौर व दीप्ती शर्मा यांचा समावेश आहे. या संघात चॅम्पियन इंग्लंडचे पाच, दक्षिण आफ्रिकेचे तीन आणि ऑस्ट्रेलियाच्या एका खेळाडूला स्थान मिळाले आहे.
हैदराबादची खेळाडू असलेल्या 34 वर्षीय मितालीने स्पर्धेत संघाचे शानदार नेतृत्व केले आणि 409 धावा फटकावल्या. मितालीने संघाला 12 वर्षांनंतर अंतिम फेरी गाठून दिली. अंतिम लढतीत भारताला इंग्लंडविरुद्ध 9 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
मितालीने उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झालेल्या साखळीतील न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत सर्वोत्तम कामगिरी केली. त्या लढतीत तिने 109 धावांची खेळी केली. स्पर्धेदरम्यान मितालीने वन-डे क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला फलंदाज ठरली. मितालीची दुसºयांदा विश्वकपच्या सर्वोत्तम संघात निवड झाली आहे. यापूर्वी 2009 मध्ये तिची या संघात वर्णी लागली होती. हरमनप्रीतने स्पर्धेत 359 धावा केल्या आणि 5 बळी घेतले तर दीप्ती शर्माने 216 धावा फटकाविताना 12 बळी घेतले.
या संघाची निवड पाच सदस्यांच्या समितीने केली. त्यात आयसीसीचे महाव्यवस्थापक (क्रिकेट) ज्योफ अलारडाइस, विंडीजचे माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप, इंग्लंडची माजी कर्णधार चार्लोट एडवर्डस्, माजी भारतीय कर्णधार व सध्या पत्रकार असलेली स्नेहल प्रधान व ऑस्ट्रेलियाची माजी अष्टपैलू लिसा स्थळेकर यांचा समावेश होता.
आणखी बातम्या
विश्वकप 2017 चा सर्वोत्तम संघ (फलंदाजी क्रमानुसार)...
टॅमी ब्यूमोंट (इंग्लंड), लौरा वोलवार्ट (दक्षिण आफ्रिका), मिताली राज (कर्णधार, भारत), एलिस पॅरी (आॅस्ट्रेलिया), सराह टेलर (यष्टिरक्षक, इंग्लंड), हरमनप्रीत कौर (भारत), दीप्ती शर्मा (भारत), मारिजान कॅप (दक्षिण आफ्रिका), डेन वान नीकर्क (दक्षिण आफ्रिका), अन्या श्रबसोल (इंग्लंड), अॅलेक्स हर्टले (इंग्लंड). 12 वी खेळाडू - नतारी सीवर (इंग्लंड).