ऑनलाइन लोकमत
डर्बी, दि. 15 - महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची उपांत्यफेरी गाठण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धच्या "करो या मरो" असलेल्या सामन्यात भारताने 50 षटकात सात बाद 265 धावा केल्या. कर्णधार मिथाली राजचे शानदार शतक (109) आणि वेदा कृष्णमुर्तीची स्फोटक फलंदाजी (70) या बळावर भारताने न्यूझीलंडला विजयासाठी 266 धावांचे लक्ष्य दिले आहे. या महत्वाच्या सामन्यात एस.मनधाना (13) आणि पूनम राऊत (4) यांची सलामीची जोडी अपयशी ठरली.
त्यानंतर मैदानावर आलेल्या कर्णधार मिथाली राजने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत एच. कौरच्या साथीने तिस-या विकेटसाठी 132 धावांची भागीदारी केली. कौरने अर्धशतक फटकावताना (60) धावा केल्या. कौर बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या डीबी शर्माला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर मैदानात आलेल्या वेदा कृष्णमुर्तीने स्फोटक फलंदाजी केली. 45 चेंडूत (70) धावा फटकावल्या. तिच्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
मिथालीसह तिने पाचव्या विकेटसाठी 108 धावा जोडल्या. वर्ल्डकपमध्ये खो-याने धावा काढणा-या मिथाली राजने 123 चेंडूत (109) धावांची शतकी खेळी केली. तिने 11 चौकार लगावले. सलग दोन पराभवांमुळे खचलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघापुढे महिला विश्वचषक क्रिकेटची उपांत्य फेरी गाठण्यासाठी आज शनिवारी न्यूझीलंडवर विजय नोंदविण्याचे आव्हान असेल.
आणखी वाचा
‘करा किंवा मरा’ अशा सामन्यात विजय न मिळाल्यास स्पर्धेबाहेर पडण्याचा धोका आहे. गुणतालिकेत चौथ्या स्थानावर असलेल्या भारताला उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी हा सामना जिंकावाच लागेल. पाठोपाठ चार विजय नोंदविल्यानंतर द. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचे तोंड पहावे लागले होते. इंग्लंड, द. आफ्रिका तसेच गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले आहे.
अखेरच्या साखळी सामन्यात जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत धडक देईल. न्यूझीलंड संघ सात गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. मागच्या सामन्यात इंग्लंडने त्यांना ७५ धावांनी धूळ चारली. भारताने मागच्या सामन्यात फारच संथ फलंदाजी केली. स्मृती मानधना लवकर बाद होताच मिताली-राऊत जोडी बॅकफुटवर आली.