ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 12 - भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज हिने वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. मिताली राज महिला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणारी फलंदाज बनली आहे. इंग्लंडमध्ये सध्या महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यामध्ये मिताली राजने या विक्रमाला गवसणी घातली. या सामन्यात 114 चेंडूंमध्ये 69 धावा फटकावून मिताली बाद झाली.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या या सामन्यात मितालीने 6 हजार धावांचा टप्पा ओलांडला. 183 एकदिवसीय सामन्यांमध्ये मितालीने हा विक्रम केला. यापुर्वी इंग्लंडची खेळाडू शार्ले एडवर्डच्या नावावर हा विक्रम होता. शार्ले एडवर्डने 191 सामन्यांमध्ये 5992 धावा बनवल्या होत्या. यासाठी शार्ले एडवर्डने 191 सामन्यांपैकी 180 डावांमध्ये फलंदाजी केली तर मितालीने त्यापेक्षा 16 डाव कमी म्हणजे केवळ 164 डावांमध्येच हा रेकॉर्ड केला.
आतापर्यंत मितालीने आपल्या करिअरमध्ये 5 शतकं आणि 48 अर्धशतकं ठोकली आहेत. विशेष म्हणजे तिने शतक ठोकलं, त्या प्रत्येक वेळी भारताला विजय मिळाला आहे. तिची फलंदाजीची सरासरी 51 आहे. सलग 7 अर्धशतकं ठोकण्याचा विक्रमही मितालीच्या नावावर आहे.
1999 मध्ये मितालीने आयर्लंड विरुद्ध पहिला वनडे सामना खेळला होता. पहिल्याच सामन्यात तिने शतकी खेळी केली होती.
महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबातीत ऑस्ट्रेलियाची माजी क्रिकेटर ब्लेंडा क्लार्क हिचा तिसरा नंबर लागतो. क्लार्कने 118 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4844 धावा तिच्या नावावर आहेत. महिला किंवा पुरूषांच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिलं आंतरराष्ट्रीय द्विशतक ठोकण्याचा विक्रमही क्लार्कच्या नावे आहे.