नवी दिल्ली : देशातील महान ऑलिम्पियनपैकी एक सुशील कुमारला हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर देशातील क्रीडा जगतात निराशेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक पटकावीत देशाची मान उंचावणारा सुशील कुमार अनेक दिवस गायब राहिल्यानंतर ज्यावेळी पकडल्या गेला त्यावेळी रविवारी त्याने आपले तोंड टॉवेलाने झाकले होते आणि दिल्ली पोलीसच्या विशेष सेलच्या अधिकाऱ्यांनी त्याचे दोन्ही हात पकडले होते. दुर्दैवाने हे सर्वकाही विश्व कुस्ती दिनाच्या दिवशी घडले.भारतीय कुस्तीची नर्सरी मानल्या जाणाऱ्या छत्रसाल स्टेडियममध्ये मारहाणीदरम्यान २३ वर्षीय मल्ल सागर धनकडच्या मृत्यूमध्ये कथित रूपाने समावेश असल्याप्रकरणी सुशील अजामीनपात्र वाॅरंटपासून पळ काढत होता. ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तिक पदके पटकाविणाऱ्या सुशीलने छत्रसाल स्टेडियमला फार लोकप्रिय केले. सागर दिल्ली पोलीसच्या कॉन्स्टेबलचा मुलगा होता आणि स्टेडियममध्ये सराव करीत होता. मारहाणीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे ५ मे रोजी त्याचा मृत्यू झाला.या घटनेमुळे भारतीय क्रीडा जगत स्तब्ध झाले आहे, पण सुशील कुमारच्या उपलब्धीचा आदर कायम आहे. सुशील कुस्तीमध्ये भारताचा एकमेव विश्व चॅम्पियन व राष्ट्रकुल स्पर्धेतील तीन वेळचा सुवर्णपदक विजेता आहे.
चौथ्यांदा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची तयारी करीत असलेला अचंता शरत कमल म्हणाला, या घटनेमुळे भारतीय खेळाच्या प्रतिमेला नुकसान होईल. जर खरेच असे घडले असेल तर ते दुर्दैवी आहे. केवळ कुस्ती नव्हे तर भारतीय खेळांवर याचा वाईट प्रभाव पडेल. सुशील आपल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. लोक त्याच्यापासून प्रेरणा घेतात. त्यामुळे त्याने खरेच असे केले असेल तर केवळ मल्लांवरच नव्हे तर अन्य खेळांच्या खेळाडूंवरही त्याचा नकारात्मक प्रभाव पडेल.’
एक माजी हॉकी कर्णधार म्हणाला, सुशीलसारख्या दर्जाच्या हिरोनेे असे कृत्य करणे खेळासाठी चांगले नाही. त्याच्यावरील आरोप सिद्ध झाले तर भारतीय खेळासाठी सर्वांत काळा अध्याय राहील. तो अनेक युवा खेळाडूंसाठी आदर्श होता.’
एक प्रख्यात नेमबाज म्हणाला, ‘ऑलिम्पियनबाबत चर्चा करताना त्यासोबत अशा बाबीची चर्चा कधी ऐकली नाही. त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. जर खरेच असे घडले असेल तर ते स्तब्ध करणारे आहे. काय घडले, याची मला कल्पना नाही.’
माजी हॉकी कर्णधार अजितपाल सिंग यांनी स्पर्धेदरम्यान सुशीलसोबतच्या संवादाचे स्मरण करताना म्हटले की, त्याच्यासोबत असे काय वाईट घडले. ते म्हणाला, ‘ही लाजिरवाणी व दुर्दैवी बाब आहे. आदर्श असण्यासह सुशीलने नेहमी उदाहरण सादर केले आहे. तो कधीच अशा प्रकारच्या वादात पडलेला नाही. त्याच्याकडे जीवनात सर्वकाही आहे. खेळाने त्याला सर्वकाही पैसा, नाव दिले आहे. तो मातीशी जोडलेला व्यक्ती आहे.’
सुशीलचा जवळचा मानला जाणारा एक अव्वल बॉक्सर म्हणाला, ‘त्याला दोन लहान मुले आहेत. त्यांच्या होणाऱ्या प्रभावाचा विचार करा.’ सुशीलने त्याचे प्रशिक्षक सतपाल यांची मुलगी सावीसोबत २०११ मध्ये विवाह केला.’