जगात निस्वार्थी प्रेम कोण करत असेल, तर ती आईच... आपण आपल्या मुलांसाठी एवढ्या खस्ता खातो, त्याची परतफेड त्यांनी करायला हवी, असा विचारही जिच्या मनात कधी येत नाही, ती आई... मुलं कितीही मोठी झाली, तरी त्यांच्यावर निरागस बाळाप्रमाणे प्रेम करणारी ती आईच असते... याची प्रचिती एका व्हॉलिबॉल सामन्यात आली. मिझोराम येथे सुरू असलेल्या व्हॉलिबॉल स्पर्धेत एक खेळाडू आपल्या 7 महिन्यांच्या बाळाला घेऊन आली होती. आपल्या संघाला जिंकून देण्याचा निर्धार तिचा होताच, पण त्याचवेळी तिच्यातील आई सतत बाळाकडे पाहत होती. आपलं बाळ भुकेलं असेल हे लक्षात येताच, तिनं सुरू असलेल्या सामन्यातून ब्रेक घेतला आणि बाळाला स्तनपान दिलं. तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिझोरामच्या या व्हॉलिबॉलपटूचा बाळाला दूध पाजतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निंगलून हंघल या अकाऊंटवर तो फोटो शेअर करण्यात आला आहे. पण, हा फोटो लिंडा छकछुक यांनी काढलेला सांगण्यात येत आहे. लॅलव्हेंटलुआंगी असे या व्हॉलीबॉल खेळाडूचे नाव आहे. टुईकूम व्हॉलीबॉल संघातील ती सदस्य आहे. खेळाडूंच्या सराव शिबिरात ती सात महिन्याच्या बाळाला घेऊन आली. सामन्यादरम्याना लॅलव्हेंटलुआंगीनं ब्रेक घेत बाळाला स्तनपान दिलं. मिझोराम राज्यस्तरीय स्पर्धेदरम्यानचा हा सामना होता.तिचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच मिझोराम क्रीडा मंत्री रॉबर्ट रोमाविया रॉयटे यांनी त्या खेळाडूला 10,000 रुपयांचे बक्षीस दिले. 9 ते 13 डिसेंबर या कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धा पार पडत आहे.