नवी दिल्ली : १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीयहॉकी संघाचे सदस्य महाराज कृष्ण कौशिक आणि रवींदर पालसिंग यांचे कोरोनामुळे शनिवारी निधन झाले. कौशिक हे ६६ तर रविंदर ६० वर्षांचे होते. रविंदर अविवाहित होते. कौशिक यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा आहे. कौशिक यांना १७ एप्रिल रोजी कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना स्थानिक नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले होते. सायंकाळी त्यांना कृत्रिम श्वासप्रणालीवर ठेवण्यात आले होते. (MK Kaushik, Ravinder Pal death due to corona) दरम्यान, १९८४ मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिक खेळणारे रवींदर पाल यांना २४ एप्रिलला विवेकानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन आठवडे कोरोनाशी झुंज दिल्यानंतर शनिवारी सकाळी लखनौमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींदर यांनी कोरोनावर मात केली. निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना कोरोना वॉर्डातून हलविण्यात आले होते; मात्र शुक्रवारी त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्याने त्यांना कृत्रिम श्वसनप्रणालीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पश्चात पुतणी प्रज्ञा यादव आहे. रवींदर यांनी हॉकी सोडल्यानंतर स्टेट बँकेतूनही स्वच्छानिवृत्ती घेतली होती. केंद्रीय क्रीडा मंत्री किरेन रिजिजू आणि हॉकी इंडियाने त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
कौशिक यांनी भारताच्या सिनियर पुरुष आणि महिला संघाला प्रशिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनात भारताच्या पुरुष संघाने बँकॉक येथे १९९८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय, महिला संघानेदेखील दोहा आशियाई क्रीडा स्पर्धेत २००६ ला कांस्यपदक जिंकले. त्यांना १९९८ ला अर्जुन पुरस्कार तसेच २००२ ला द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
सीतापूर येथे जन्मलेले रवींदर पाल हे सेंटर हाफ खेळायचे. १९७९ आणि १९८४ या काळात दोन (मास्को तसेच लॉस एंजिलिस)ऑलिम्पिकशिवाय १९८० आणि १९८३ची चॅम्पियन्स चषक स्पर्धा, १९८२ चा विश्वचषक आणि त्याचवर्षी झालेल्या आशिया चषक स्पर्धेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.