ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - आयपीएलचा हंगाम ऐन बहरात असताना वादग्रस्त क्रिकेट प्रशासक आणि आयपीएलचे माजी आयुक्त ललित मोदी यांनी एका नव्या वादाला तोंड फोडण्याचा प्रयत्न केला आहे. ललित मोदींनी सोशल साइट इंस्टाग्रामवर एक पत्र टाकले आहे. हे पत्र भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे अपॉइन्टमेन्ट लेटर असल्याचा दावा करण्यात येत आहे. हे लेटर अन्य कुणाच्या कंपनीचे नसून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि चेन्नई सुपरकिंग्जचे मालक एन. श्रीनिवासन यांचे असल्याचे सांगण्यात येत आहे.
या पत्रातील उल्लेखानुसार धोनीला श्रीनिवासन यांच्या इंडिया सिमेंट कंपनीच्या चेन्नई कार्यालयात व्हाइस प्रेसिडेंट (मार्केटिंग) म्हणून नियुक्त करण्यात आले होते. या पत्रात धोनील देण्यात येणाऱ्या पगाराचाही उल्लेख आहे. या उल्लेखानुसार भारतीय संघात अ वर्गातील खेळाडू असणाऱ्या धोनीला दरमहा केवळ 43 हजार रुपये मानधन निश्चित करण्यात आले होते. तसेच त्याला इतर सुविधा आणि भत्तेही देण्यात येत होते.
दरम्यान. या पत्रासोबतच मोदी यांनी श्रीनिवासन, राजीव शुक्ला आणि आणि केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे फोटोही शेअर केले आहेत. तसेच आयपीएलमध्ये श्रीनिवासन यांनी चेन्नई सुपरकिंग्ज या आपल्या संघाला फायदा पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोपही केला.
बीसीसीआयच्या माजी अधिकाऱ्यांनी सातत्याने नियमावलीचे उल्लंघन केले. त्यात धोनीचे अपॉइंटमेन्ट लेटर माझ्यासाठी धक्कादायक आहे. वर्षाला 100 कोटींहून अधिक कमाई करणारा खेळाडू श्रीनिवासन यांचा कर्मचारी होण्यासाठी का तयार होतो? दरम्यान मोदी यांची ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.