डर्बी : २५० पेक्षा अधिक धावा फटकावणे महिला क्रिकेटच्या पूर्ण विकासासाठी चांगले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजने व्यक्त केली. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्वकप क्रिकेट स्पर्धेत शनिवारी यजमान इंग्लंडचा ३५ धावांनी पराभव केला. स्मृती मानधना (९० धावा, ७२ चेंडू) आणि पूनम राऊत (८६ धावा, १३४ चेंडू) यांनी सलामीला १४४ धावांची भागीदारी केली. मितालीने ७१ धावांची खेळी केली. सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना मिताली म्हणाली,‘परिस्थिती गोलंदाजीसाठी अनुकूल होती. त्यामुळे इंग्लंडने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा निर्णय घेतला. या दोघींनी डावाची सुरुवात केली ते बघून त्या विश्वकप स्पर्धेत खेळत आहेत, असे वाटत नव्हते. त्यांच्यावर कुठलेही दडपण नव्हते. त्या केवळ आपल्या क्षमतेनुसार खेळत होत्या. २५ षटकांपर्यंत हीच परिस्थिती होती. ५० पैकी २५ षटके तर आमच्या सलामीवीरांनीच फलंदाजी केली. ही भागीदारी शानदार होती. आगामी लढतींमध्येही आम्हाला अशाच प्रकारची सुरुवात अपेक्षित आहे. सलामीला मोठी भागीदारी झाली तर मधल्या फळीतील खेळाडूंना आक्रमक खेळी करण्याची संधी असते. त्यामुळे २५० पेक्षा अधिक धावा फटकावणे सोपे होते आणि महिला क्रिकेटसाठी ही चांगली बाब आहे.’ (वृत्तसंस्था)‘बीसीसीआय महिला संघाची शानदार फलंदाजी. स्मृती मानधना, पूनम राऊत आणि मिताली राज यांची शानदार खेळी. दीप्ती शर्मातर्फे शानदार धावबाद. भारतीय संघासाठी हा ‘टर्निंग पॉर्इंट’. - सचिन तेंडुलकरबीसीसीआय महिला संघाचे शानदार विजयासाठी अभिनंदन. यजमान संघाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करणे निश्चितच चांगली सुरुवात. - विरेंद्र सेहवागबीसीसीआय महिला संघाचे शानदार विजयासाठी अभिनंदन. याचप्रमाणे खेळत राहा.- शिखर धवन, सलामीवीरमाजी भारतीय कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी टिष्ट्वट केले, ‘भारतीय महिला संघाने इंग्लंडचा पराभव करीत विश्वकप मोहिमेची शानदार सुरुवात केली. त्यांना शानदार खेळताना बघणे सुखद होते. चांगली कामगिरी करा. मला आनंद झाला.’
२५० पेक्षा अधिक धावा महिला क्रिकेटसाठी चांगल्या : मिताली
By admin | Published: June 26, 2017 1:26 AM