ऑनलाइन लोकमत ओव्हल, दि. 18 - भारत-पाकिस्तानच्या आजच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्याची राजकीय वर्तुळापासून क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. या दोन प्रतिस्पर्धी देशांमधला अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांचीही लक्षणीय उपस्थिती दिसून येईल. भारत-पाक महामुकाबला लंडनच्या थेट ओव्हल ग्राऊंडवर जाऊन पाहणा-या प्रेक्षकांशिवाय इतरही टीव्हीच्या माध्यमातून हा सामना पाहतील. जगभरातील क्रिकेटचे चाहते आज टीव्हीसमोरच बसतील. आज पूर्ण जगभरात जवळपास 32 कोटी 40 लाख प्रेक्षक आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा सामना पाहतील, असा अंदाज आयसीसी(इंटरनॅशनल क्रिकेट काऊन्सिल)नं वर्तवला आहे. जर असे झाल्यास हा क्रिकेट इतिहासातला सर्वात जास्त पाहण्यात आलेला महामुकाबला ठरेल. खरं तर 2011मधला वर्ल्ड कप अंतिम सामना सर्वाधिक पाहण्यात आला होता. तो सामना जवळपास 55 कोटी 80 लाख लोकांनी पाहिला होता. त्याच वेळी दुस-या स्थानावर भारत आणि पाकिस्तानदरम्यान खेळण्यात आलेला वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीचा सामना होता. तो सामना 49 कोटी 50 लाख प्रेक्षकांनी पाहिला होता.
तसेच भारत-पाकिस्तानदरम्यानच्या वर्ल्ड कप 2015चा सामना 31 कोटी 30 लाख प्रेक्षकांनी पाहिला होता. तसेच भारत आणि श्रीलंका या संघांदरम्यान झालेला वर्ल्ड कप 2011चा सामना 30 कोटी जनतेनं पाहिला होता. आता आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात होत असलेला अंतिम सामना टीव्हीवरील प्रेक्षक संख्येचे इतर सर्व रेकॉर्ड तोडतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.