ऑनलाइन लोकमत
बर्मिंगहॅम, दि. 15 - प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीची उपांत्यफेरी खेळणा-या बांगलादेश संघाचा कर्णधार मशरफी मुर्तजाने आपल्या संघावर दबाव असल्याचे कबूल केले. आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धेमध्ये प्रथमच बांगलादेशच्या संघाने उपांत्यफेरीत मजल मारली आहे. आम्ही उपांत्यफेरीचा सामना खेळतोय त्यामुळे निश्चित दबाव असणार. पण आमच्यावर जसा दबाव आहे तसाच किंबहुना त्यापेक्षा जास्त दबाव भारतावर आहे.
भारताची लोकसंख्या आणि क्रिकेटची लोकप्रियता यामुळे भारतावर आमच्यापेक्षा जास्त दबाव असेल असे मुर्तजा म्हणाला. सामन्यापूर्वी आयोजित पत्रकारपरिषदेत त्याने हे विधान केले. 4 बाद 33 असा डाव अडचणीत बांगलादेशने 265 धावांचे लक्ष्य पार करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडसारख्या बलाढय संघावर विजय मिळवून उपांत्यफेरीत पोहोचल्याने बांगलादेशातील क्रिकेटप्रेमींच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत तसेच त्यांचा आत्मविश्वासही कमालीचा उंचावला आहे.
दोन्ही संघांवर अपेक्षांचा दबाव आहे. शेवटी हा क्रिकेटचा खेळ आहे. जो संघ चांगला क्रिकेट खेळेल तो संघ जिंकेल. मी माझ्या सहका-यांना या लढतीकडे उपांत्यफेरी म्हणून नव्हे तर, फक्त एक सामना म्हणून पाहण्यास सांगितले आहे. कारण तुम्ही मनातून उपांत्यफेरीत खेळत आहात असा विचार केला तर नक्कीच तुमच्यावर दबाव वाढेल पण तुम्ही याकडे फक्त एक मॅच म्हणून पाहिले तर तुम्ही अधिक चांगला खेळ करु शकता असे मुर्तजा म्हणाला.
आणखी वाचा
कागदावर भारतीय संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. पण क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ असल्यामुळे बांगलादेशला विजयाचा दावेदार न समजणे चुकीचे ठरेल. भारतीय संघ या शेजारी देशाच्या संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही. बांगलादेशने साखळी फेरीत न्यूझीलंडविरुद्ध दमदार पुनरागमन करताना विजय मिळवला होता, त्यामुळे या संघाला कमकुवत लेखणे चुकीचे ठरेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चमकदार कामगिरी केल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वासही उंचावलेला आहे.
भारतीय कामगिरीत सातत्य राखत बांगलादेशला धडा शिकविण्यास प्रयत्नशील राहील. भारतीय फलंदाज फॉर्मात असून गोलंदाज चांगली कामगिरी करीत आहेत, क्षेत्ररक्षणही चांगले आहे. एकूण विचार करता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ खेळाच्या सर्वच विभागत अव्वल भासत आहे.