नवी दिल्ली : जितेंदर कुमार याने शुक्रवारी झालेल्या ७४ किलो गटाच्या कुस्ती चाचणीत विजय मिळवून इटलीत होणारी प्राथमिक फेरी आणि येथे होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता गाठली. आलिम्पिक पात्रता फेरीत अनुभवी सुशील कुमारचा मार्ग रोखण्यासाठी या दोन्ही स्पर्धेत पदक जिंकण्याचे अवघड आव्हान जितेंदर कुमारपुढे असेल.जागतिक अजिंक्यपदाचा स्टार दीपक पुनिया (८६ किलो) आणि रवी दहिया (५७) यांना थेट अंतिम फेरीत प्रवेश देण्यात आल्याने त्यांना घाम गाळावा लागला नाही. या दोघांनी सहज विजय नोंदवले. सुमित मलिक (१२५) आणि सत्यव्रत कदियान (९७) यांनीही आपापल्या प्रतिस्पर्धी मल्लांवर मात केली.जितेंदरने अंतिम फेरीत अमित धनकड याच्यावर ५-२ ने मात केली. कुस्ती महासंघाने बुधवारी घोषणा केली की शुक्रवारच्या चाचणीत विजेता मल्ल १५ ते १८ जानेवारीदरम्यान इटलीतील रँकिंग सिरीजमध्ये, नवी दिल्लीतील आशियाई चॅम्पियनशिपमध्ये तसेच २७ ते २९ मार्चदरम्यान जियान येथे होणाºया आशियाई आॅलिम्पिक पात्रता फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करेल. मात्र डब्ल्यूएफआय अध्यक्ष बृजभूषणसिंग यांनी जियान स्पर्धेच्या आधी पुन्हा चाचणी घेण्याचे संकेत दिले आहेत.याचा अर्थ असा की जितेंदरला टोकियो आॅलिम्पिकचे स्थान पक्के करायचे झाल्यास त्याला इटली आणि नवी दिल्ली स्पर्धेत पदक जिंकून महासंघाचे लक्ष वेधून घ्यावेच लागेल. शरण म्हणाले, ‘पहिल्या दोन्ही स्पर्धेत मल्लांची कामगिरी समधानकारक झाली नाही असे आम्हाला वाटले तर आॅलिम्पिक पात्रता फेरी स्पर्धेआधी पुन्हा चाचणीचे आयोजन केले जाईल. सुशील कुमारने जखमी झाल्याचे सांगून चाचणीत सहभागी होण्याचे टाळले.’याआधी सप्टेंबर २०१९ ला झालेल्या विश्व चॅम्पियनशिपच्या चाचणीत सुशीलने जितेंदरला पराभूत केले होते. जितेंदरने आगामी दोन्ही स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केल्यास सुशीलच्या नावाचा विचार होणार नसल्याचेही महासंघाने स्पष्ट केले आहे. सुशीलला चाचणीत सहभागाशिवाय आॅलिम्पिक पात्रता फेरी खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. (वृत्तसंस्था)दीपक पुनियाने एकतर्फी झालेल्या सामन्यात पवन सरोहाचे आव्हान ६-२ असे सहजपणे परतवून लावले, तर सत्यव्रतने मौसम खत्रीवर तांत्रिक खेळात राखलेल्या वर्चस्वाच्या बळावर मात केली. सुमितने सतेंदरला ९-० ने नमवले. बजरंग पुनियाला चाचणीतून वगळण्यात आल्याने ६५ किलो वजन गटासाठी चाचणी झाली नाही. ग्रीको रोमन प्रकारात गुरप्रीतसिंगने (७७) अपेक्षेनुसार सजन भानवाल याच्यावर मात केली. महिलांची चाचणी शनिवारी होईल.
जितेंदर आशियाई अजिंक्यपदासाठी पात्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 2:56 AM