मुंबई : मल्टी स्क्रीन मीडियाने सियाराय पोदार ग्रुपवर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवत टी- २० क्रिकेट स्पर्धेच्या ‘ई’ डिव्हिजनमध्ये विजेतेपद पटकावले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या लढतीत सियाराम पोदारने नाणेफेक जिंकून मल्टी स्क्रीन मीडियाला प्रथम फलंदाजी दिली; पण हा निर्णय त्यांच्यावर बुमरँगप्रमाणे उलटला. विपिनने ५६ चेंडूंतच ७५ धावांची दणकेबाज सलामी दिली. चौरसियाने ३७ चेंडूंतच सहा चौकार व दोन षटकारांसह ५९ धावा केल्या. नंतर आलेल्या विशाल पांडे (३०), अमेय जाधव (ना. ३६) व प्रथमेश राऊळ (ना. २०) यांनीही धावांचा वेग कायम राखल्याने निर्धारित २० षटक ांत त्यांनी ३ बाद १७१ धावा केल्या.या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या सियाराम पोदारला मध्यमगती गोलंदाज अजय सिंग, अनिरुद्ध जाधव (९/२) यांनी सुरुवातीलाच धक्के दिल्याने त्यांचा निम्मा संघ ३२ धावांतच तंबूत परतला होता. त्यानंतर तुषार झवेरी (३३) व मोहित अवस्थी (३३) यांनी सहाव्या विकेटसाठी ४७ धावांची भागी रचली. मात्र संघाचा पराभव टाळण्यासाठी ती पुरेशी नव्हती. ओंकार गांगणने १५ धावांत २ बळी मिळवत संघाच्या यशात खारीचा वाटा उचलला. चौरसियाची सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. विजेत्या संघाला दोन लाखांचे तर उपविजेत्यांना दीड लाखाचे इनाम मिळाले. (क्रीडा प्रतिनिधी)
मल्टी स्क्रीन मीडिया चॅम्पियन
By admin | Published: February 04, 2015 2:51 AM