ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22 - मिशेल मॅक्लनघन आणि जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने 14 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिलेल्या अवघ्या 142 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली डेअरडेव्हिल्सची सुरवातच खराब फलंदाजीने झाली.
दिल्ली डेअरडेव्हिल्सने 20 षटकात सात बाद 128 धावा केल्या. सलामीचा फलंदाज संजू सॅमसनने अवघ्या 9 धावा काढून तंबूत परतला. त्याला मॅकक्युघनने रोहित शर्मा करवी झेलबाद केले. तर, आदित्य तरेला आपले खाते उघडता आले नाही. तो शून्य धावेवर पायचीत झाला. कृणाल नायर (5), श्रेयस अय्यर (6) आणि कोरी अॅन्डरसन व रुषभ पंत सुद्धा शून्य धावेवर तंबूत परतले. त्यानंतर अंतिम टप्प्यात फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या रबाडा आणि ख्रिस मॉरिस यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो म्हणाला तसा यशस्वी ठरला नाही. त्यामुळे मुंबईने दिलेले अवघ्या 142 धावांचे आव्हान दिल्लीला गाठता आले नाही. या सामन्यात रबाडाने 44 धावा केल्या. त्याला गोलंदाज जसप्रीत बुमराहने त्रिफळाचीत केले. तर ख्रिस मॉरिसने नाबाद 52 धावांची खेळी केली. मात्र, ती निष्फळ ठरली. कमिन्सला नाबाद 4 धावा काढता आल्या.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सने आठ गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 142 धावा केल्या होत्या. मुंबई इंडियन्सकडून जॉस बटलरने सर्वाधिक 28 धावा केल्या. पोलार्डने 26 आणि हार्दिक पांडयाने 24 धावा केल्या. या तिघांच्या फलंदाजीमुळे मुंबई इंडियन्सला 142 धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार रोहित शर्मासह अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
मुंबई इंडियन्सकडून गोलंदाज मिशेल मॅक्लनघनने तीन बळी घेतले. तर, जसप्रीत बुमराहने दोन आणि हार्दिक पांड्याने एक बळी टिपला. तसेच, दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून अमित मिश्रा, कमिन्सने प्रत्येकी दोन आणि रबाडाने एक बळी घेतला.