रवी शास्त्री लिहितात...
पाहुण्या संघांसाठी सध्या मुंबई ‘टॉर्चर चेंबर’ बनले आहे. मुंबईविरुद्ध सोमवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी पुणे संघालाही त्याची कल्पना येईल. पाहुण्या संघात जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी स्टिव्ह स्मिथ, सर्वोत्तम अष्टपैलू बेन स्टोक्स आणि सर्वोत्तम फिनिशर महेंद्रसिंह धोनी यांचा समावेश असला तरी त्याचा यजमान संघावर विशेष प्रभाव पडणार नाही. कारण हे खेळाडू सर्वंच षटके टाकत नाहीत किंवा सर्वंच चेंडूवर फलंदाजी करीत नाहीत. अन्य खेळाडूंनाही मुंबईच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पुणे संघासाठी मुंबई संघाचे आव्हान पेलणे सोपे नाही, याची अनेक कारणे आहेत. आयपीएलच्या दहाव्या पर्वाच्या सलामी लढतीत पुणे संघाने मुंबईचा पराभव केला होता. मुंबईचा संघ या एकमेव लढतीत थोडा कमकुवत भासला होता. अशा स्थितीत रोहित शर्मा अँड कंपनी हिशेब चुकता करण्यास उत्सुक असेल. मुंबई संघ सध्या सर्वांत आक्रमक क्रिकेट खेळत आहे. त्यांचे कुठलेच पाऊल चुकीच्या दिशेला जात नाही. दिल्लीविरुद्धच्या लढतीत टी-२० क्रिकेटमध्येही त्यांची आक्रमकता कसोटी क्रिकेटला शोभेल अशी होती. मुंबई असा संघ आहे, की प्रत्येक चेंडूवर विकेट घेतो आणि प्रत्येक चेंडूला सीमापार धाडतो, असे चित्र आहे. पुणे संघात सुधारणा अनुभवायला मिळालेली नाही, असे नाही. त्यांनी सलग दोन सामन्यांत विजय मिळवला आहे. राहुल त्रिपाठीसारखा युवा फलंदाज आपली छाप उमटवत आहे. इम्रान ताहिरची प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे. स्मिथ व स्टोक्स या दोघांकडून लौकिकाला साजेशी कामगिरी अपेक्षित आहे. अजिंक्य रहाणेला विसरता येणार नाही. पुणे संघात दिग्गज खेळाडूंचा समावेश असून मुंबई संघाला टक्कर देण्यासाठी या सर्व दिग्गजांना लौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागेल. (टीसीएम)