मुंबई : मुंबई जिल्हा हौशी सायकलिंग संघटना आणि मुंबई उपनगर जिल्हा संघटना आयोजित मुंबई अजिंक्यपद सायकलिंग शर्यतीत पुरुषामध्ये सोनू गुप्ताने तर महिला गटात संज्ञा कोकाटेने बाजी मारली. १७ वर्ष मुलाच्या गटात अज्ञेय जनावळेकर तर १४ वर्ष मुलांमध्ये मणिंदरसिंग कुंडी विजेते ठरले.
पूर्व महामागार्वरील कांजूरमार्ग परिसरातील सर्व्हिस रोडवर झालेल्या पुरुषांच्या ३० किलोमीटर अंतराच्या शर्यतीत चांगलीच चुरस पाहायला मिळाली. सोनू गुप्ताने अवघ्या २ शतांश सेकंदाच्या फरकाने सरशी मिळवत अजिंक्यपदावर नाव कोरले. सोनुने हि शर्यत ४३ मिनिटे ४१:५९ सेकंदात पूर्ण केली. तर हेच अंतर ४३ मिनिटे ४२:०१ सेकंदात पूर्ण करणाऱ्या चिन्मय केवलरामानीला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. या दोघांच्या तुलनेत ३;०९ शतांश सेकंद मागे राहिलेला अक्षय मोये तिसऱ्या स्थानी राहिला. महिलांच्या ६ किलोमीटर अंतराच्या शर्यतीत संज्ञाने यावेळी चांगलीच तयारी केली असल्याचे पाह्यला मिळाले. संज्ञाने मदुरा वायकरला मागे टाकत प्रथमच विजेतेपदावर आपला हक्क सांगितला. प्रिया ढबालियाने तिसरे स्थान मिळवले.
मुलांच्या शर्यतीत अज्ञेयने वेद केरकरचे आव्हान परतवून लावत १७ वर्ष वयोगटाची १२ किलोमिटर अंतराची शर्यत जिंकली. या गटात सिद्धार्थ दवंडे तिसरा आला. ६ किलोमीटर अंतराच्या १४ वर्ष मुलांच्या शर्यतीत मणिंदरसिंग कुंडी पहिले स्थान मिळवले. शौर्य मकवानाने आपलाच भाऊ पुण्यला मागे टाकत दुसरा क्रमांक संपादन केला.