ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - सलग सहा सामन्यांपासून अपराजित असलेल्या मुंबईसमोर आयपीएलमध्ये आज सुरू असलेल्या लढतीत रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 161 धावांचे आव्हान ठेवले. अजिंक्य रहाणे आणि राहुल त्रिपाठी यांनी दिलेल्या दमदार सलामीनंतर मुंबईकरांनी पुण्याच्या धावसंख्येस लगाम घातला. त्यामुळे पुण्याला 20 षटकांत 6 बाद 160 धावांपर्यंतच मजल मारता आली.
रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर अजिंक्य रहाणे (38) आणि राहुल त्रिपाठी (45) यांनी पुण्याला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनीही संघाला 76 धावांची सलामी दिली. मात्र याच धावसंख्येवर अजिंक्य रहाणे कर्ण शर्माची शिकार झाला. त्यानंतर पुण्याचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले. चांगली फलंदाजी करत असलेला राहुल त्रिपाठीही 45 धावा काढून माघारी परतला.
स्टीव्हन स्मिथ (17), बेन स्टोक्स (17), महेंद्रसिंग धोनी (7) यांनी साफ निराशा केली. त्यामुळे पुणेकर अधिकच अडचणीत सापडले. मात्र मनोज तिवारीने झटपट 23 धावा फटकावत पुण्याला निर्धारित 20 षटकात 6 बाद 160 धावांपर्यंत मजल मारून दिली. मुंबईकडून बुमरा आणि कर्ण शर्माने प्रत्येकी दोन तर मिचेल जॉन्सन आणि हरभजन सिंगने प्रत्येकी एक गडी टिपला.