नवी दिल्ली : मुंबई संघाने पाहुण्या संघाला भारतीय वातावरणात कसे खेळावे लागते, याचा धडा दिला असून आगामी कसोटी मालिकेत भारताला पराभूत करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया सराव सामन्यात शतकी खेळी करणारा न्यूझीलंडचा फलंदाज ल्यूक रोंचीने व्यक्त केली. भारत दौऱ्यातील एकमेव सराव सामन्यात न्यूझीलंडसाठी सकारात्मक बाबी अधिक घडल्या, असेही रोंची म्हणाला.सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोंची म्हणाला, ‘आम्हाला या खेळपट्टीवर खेळण्याची सवय झाली. तीन दिवसांमध्ये खेळपट्टीचे स्वरूप बदलले. अखेरच्या दिवशी येथे चेंडू चांगले वळत होते. मुंबई संघाने फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही विभागात चांगली कामगिरी केली. त्यांच्याकडून आम्हाला काही शिकता येईल. शनिवारी अखेरच्या सत्रात त्यांनी आमच्यावर वर्चस्व गाजवले. त्यावेळी आम्हाला योजनाबद्ध खेळ करता आला नाही. आम्हाला या लढतीतून बरेच काही सकारात्मक आणि काही नकारात्मक निकाल मिळाले. त्यावर आम्हाला तोडगा काढावा लागेल.’ (वृत्तसंस्था)
मुंबईने धडा घालून दिला : रोंची
By admin | Published: September 19, 2016 3:56 AM