मुंबई : अॅल्डेन नोरोन्हा आणि कीर्ती भोईटे यांनी अनुक्रमे ११० मीटर अडथळा आणि २०० मीटर शर्यतीत जबरदस्त वर्चस्व राखताना आंतर विद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबई विद्यापीठासाठी सुवर्ण कामगिरी केली. त्याचप्रमाणे गोळाफेकीमध्ये पूर्वा रावराणे हिने मुंबई विद्यापीठासाठी रौप्य पदकाची कमाई केली.कर्नाटक येथील मूदुबिदिरे येथील स्वराज्य मैदानावर झालेल्या ८०व्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या खेळाडूंनी आपली छाप पाडली. या स्पर्धेत चमकलेल्या मुंबईकर खेळाडूंनी यावेळी भुवनेश्वर येथे २२ फेब्रुवारी ते ३ मार्च दरम्यान होणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघातही स्थान मिळवले.पुरुष ११० मीटर अडथळा शर्यतीत मुंबईच्या अॅल्डेनने जबरदस्त वर्चस्व राखताना १४.२६ सेकंदाची वेळ नोंदवली. त्याच्या धडाक्यापुढे मंगलोर विद्यापीठाच्या देबार्जुन मुर्मु (१४.४०) आणि महात्मा गांधी विद्यापीठाच्या रोनाल्ड बाबु (१४.५५) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या २०० मीटर शर्यतीमध्ये कीर्तीने मुंबईसाठी सुवर्ण धाव घेतली. तिने सुरुवातीपासून राखलेले वर्चस्व अखेरपर्यंत कायम राखताना २४.७१६ सेकंदाची वेळ देत सुवर्ण पदकावर नाव कोरले. पालमुरु विद्यापीठाच्या हरिका देवी (२४.८४०) आणि कालिकत विद्यापीठच्या श्रुतीराज यू. व्ही. (२४.९९८) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य जिंकले.खेलो इंडिया गेम्स खेळाडू :अॅल्डेन नोरोन्हा, पूर्वा रावराणे, कीर्ती भोईटे, अक्षय शेट्टी (२०० मी.), कृष्णा, निधी सिंग (४०० मी. अडथळा) मिश्र रिले संघ : कीर्ती भोईटे, निधी सिंग, अतुल साळुंखे, अरनॉल्ड - अक्षय शेट्टी.>गोळाफेकीत चंदेरी यशमहिलांच्या गोळाफेक स्पर्धेत मुंबईच्या पूर्वा रावराणेला सुवर्ण पदकापासून वंचित रहावे लागले. तिने १४.४५ मीटरची फेक करत मुंबई विद्यापीठाचे रौप्य पदक निश्चित केले. मेरठच्या चरणसिंग विद्यापीठच्या किरण बालियनने (१५.६९) एकहाती वर्चस्व राखताना सुवर्ण पटकावले. बरेलीच्या रोहिलखंड विद्यापीठाच्या श्रृष्टी विगने (१४.३२) कांस्य जिंकले. याआधी झालेल्या प्राथमिक फेरीत पूर्वा १३.८७ मीटरच्या फेकीसह तिसºया स्थानी राहिली होती. मात्र अंतिम फेरीत तिने आपल्या कामगिरीत सुधारणा केली.
आंतर विद्यापीठ अॅथलेटिक्स स्पर्धेत मुंबईकरांची छाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 4:15 AM