नामदेव कुंभार
मुंबई, दि. २० - रॉयल्स चँलेंजर्स बंगळुरुने विजयासाठी दिलेले १७१ धावांचे आव्हान मुंबई इंडियन्सने निर्धारित १८ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात पार करत ६ गड्यांनी रॉयल विजय मिळवला.
मुंबईची सुरवात निराशजनक झाली सलामीविर पार्थिव पटेल (५) स्वस्तात बाद झाला. कर्णधार रोहित शर्माने एकहाती किल्ला लढवताना ४४ चेंडूत ६२ धावांची धमाकेदार खेळी केली. या खेळीदरम्यान ३ षटकार आणि ४ चौकाराची अतिषबाजी केली.
दुसऱ्या विकेटसाठी राहित आणि रायडूने (३१) दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. जोस बटलर ने १४ चेंडूत २८ धावांची झटपट खेली केली. केरॉन पोलार्डने हार्दिक पांड्याला सोबत घेऊन विजय संपादन केला. पोलार्डने १९ चेंडूत नाबाद ४० धावांची खेळी केली.
आरसीबीकडून इक्कबाल अब्दुलाने ३ फलंदाजांना बाद केले.
त्यापुर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कर्णधार विराट कोहली व धडाकेबाज एबी डिव्हीलियर्स यांच्या फटकेबाजीच्या जोरावर रॉयल्स चँलेंजर्स बंगळुरुने मोठ्या धावसंख्येकडे कूच केली होती. मात्र कृणाल पांड्याने एकाच षटकात या दोघांचा बळी घेत मुंबई इंडियन्सला पुनरागमन करुन दिली. मात्र अखेरच्या क्षणी ट्राविस हेड व सरफराज खान यांनी केलेल्या हल्ल्याच्या जोरावर बंगळुरुने मुंबईपुढे विजयासाठी १७१ धावांचे आव्हान उभे केले.
वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात मुंबईकरांनी सुरुवातीला बंगळुरुला जखडवून ठेवले. मॅक्क्लेनघनचा एक भेदक बाऊंसर डोक्यावर आदळल्यानंतर बंगळुरुच्या लोकेश राहूलने मॅक्क्लेनघनलाच लक्ष्य करत एकाच षटकात २ षटकार व १ चौकार खेचून बंगळुरुच्या धावगतीला वेग दिला. मॅक्क्लेनघनने राहूलला (१४ चेंडूत २३ धावा) बाद करुन मुंबईला चौथ्या षटकात पहिले यश दिले. यानंतर एबीने कोहलीसह ५९ धावांची भागीदारी करुन मुंबईला पळवले. मात्र ११व्या षटकात कृणालने या दोघांचा बळी घेत सामना फिरवला.
कोहली ३० चेंडूत ३ चौकारांसह ३३ धावांवर बाद झाला. तर एबीने २१ चेंडूत ३ चौकार व एका उत्तुंग षटकारासह २९ धावा फटकावल्या. शेन वॉटसनही (५) जसप्रीत बुमराहचा शिकार ठरल्याने बंगळुरुचा डाव ४ बाद ९९ असा घसरला. दडपणाखाली आलेल्या बंगळुरुला सरफराज व हेड यांनी सावरताना ६३ धावांची आक्रमक भागीदारी केली. हरभजनने हेडला धावबाद करुन ही जोडी फोडली. तर बुमराहने अखेरच्या षटकात सरफराज व स्टुअर्ट बिन्नीला बाद करुन बंगळुरुला ७ बाद १७० धावांवर रोखले. हेडने २४ चेंडूत ३७ धावा फटकावल्या. तर सरफराजने १८ चेंडूत २८ धावांचा तडाखा दिला. मुंबईकडून बुमराह (३/३१), कृणाल (२/२७) यांनी चांगला मारा केला.