ऑनलाइन लोकमत
मोहाली, दि. २५ - सुरवातीला केलेल्या दमदार फलंदाजीनंतर गोलंदाजांनी केलेल्या शिस्तबद्ध कामगीरीच्या जोरावर मुंबईने पंजाबचा २५ धावांनी पराभव केला. मुंबईने दिलेल्या १९० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबला २० षटकात ७ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावापर्यंत मजल मारता आली. मोक्याच्या क्षणी मुंबईकर गोलंदाजांनी आक्रमक गोलंदाजी करत मार्श- मॅक्सवेलला रोखले.
रायडू, पार्थिव, मिशेल मॅक्लेनघन, बुमराह आणि टीम साऊदी मुंबईच्या विजयाचे शिल्पकार ठरले. बुमराहने ४ षटकात २६ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले तर टीम साऊदी आणि मिशेल मॅक्लेनघनने प्रत्येकी २ फलंदाजाला बाद केले. पंजाबकडून मार्शने ४५ तर मॅक्सवेलने ५६ धावांची खेळी केली. कर्णाधार मिलरने ३० धावांचे योगदान दिले. पंजाबच्या इतर फलंदाज लौकीकास खेळी करण्यात अपयशी ठरले.
त्यापुर्वी, पार्थिव पटेल आणि अंबाती रायडू यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबईने पंजाब समोर १९० धावांचे आव्हान ठेवले होते. मुंबईने निर्धारित २० षटकात ६ गड्यांच्या मोबदल्यात धावा १८९ केल्या. पार्थिव पटेलने धडाकेबाज फलंदाजी करताना ५८ चेंडूत १० चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८१ धावा केल्या होत्या. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करताना पंजाब संघाने दमदार सुरवात केली. पहिल्याच षटकात संदीप शर्माने कर्णधार रोहित शर्माला बाद केले.
शर्मा बाद झाल्यानंतर दबावात आलेल्या मुंबई संघाने संथ सुरवात केली. मैदानावर जम बसल्यानंतर रायडू-पटेलने पंजाबची गोलंदाजी तोडून काढली. रायडू - पटेलने दुसऱ्या विकेटसाठी १३७ धावांची भागीदारी केली, १४.१ षटकात प्रतिषटक ९.६७च्या सरासरीने त्यांनी धावा चोपल्या. अबाती रायडूने धडाकेबाज फलंदाजी करताना ३७ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने ६७ धावांचे योगदान दिले. रायडू बाद झाल्यानंतर बटलरने १३ चेंडूत झटपट २४ धावांचे योगदान दिले. त्याने १ षटकार आणि ३ चौकार लगावले.
पार्थिव पटेल आणि बटलर यांच्या दरम्यान ३ विकेटसाठी ३.२ षटकात ३७ धावांची भागीदारी झाली. पटेल बाद झाल्यानंतर पालार्डला आपल्या लौकीकास साजेशी खेळी करता आली नाही. मोहित शर्माने शेवटच्या २ चेंडूवर २ फलंदाज बाद केले. पोलार्डने १० आणि हार्दिक पांड्याने ४ धावांचे योगदान दिले. रायडूला ९व्या षटकात जिवदान मिळाले तर पटेलला ५व्या षटकात जिवदान मिळाले. मिळेलेल्या जिवदानाचा दोघानी पुरेपुर फायदा घेतला. पंजाबकडून मोहित शर्माने ३ फलंदाजाला बाद केले तर संदिप शर्मो, अक्षर पटेल, जॉनसन ने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.