- राेहित नाईकमुंबई - मॅरेथॉन स्पर्धेत शारीरिक क्षमतेसोबतच हवामानाचीही निर्णायक भूमिका असते. रविवारी पार पडलेल्या २०व्या मुंबई मॅरेथॉनमध्ये याच हवामानामुळे धावपटूंना अडचणीचा सामना करावा लागला. यामुळेच आघाडीच्या भारतीय धावपटूंनी पदक जिंकल्यानंतरही आपली नाराजी व्यक्त करताना पूर्ण मॅरेथॉन पहाटेच्या वेळी सुरू करण्यात यावी, असे मत व्यक्त केले. दरम्यान, पुरुष एलिट मॅरेथॉनमध्ये इरिट्रीयाच्या धावपटूंनी सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. महिलांमध्ये केनिया, बहरेन आणि इथिओपिया येथील धावपटूंनी बाजी मारली.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गारठा होता. मात्र, रविवारी गारवा कमी झाल्याने भारतीय धावपटूंनी ४२ किमी अंतराची पूर्ण मॅरेथॉन सकाळी ७:२० ऐवजी पहाटे ५:३० वाजता सुरू करण्याची मागणी केली. एलिट गटात इरिट्रीयाच्या बेरहाने टेस्फे याने २ तास ११.४४ मिनिटांची वेळ देत सुवर्ण जिंकले. त्याच्याच देशबांधव मेरहावी केसेटे याने २ तास ११.५० मिनिटांची वेळ देत रौप्य जिंकले. इथियोपियाच्या टेस्फेये डेमेके (२:११.५६) याने कांस्य पदकावर समाधान मानले. महिलांमध्ये, जॉयस टेले (केनिया) हिने २ तास २४.५६ मिनिटांची वेळ देत सुवर्ण पटकावले. शिताये इशेते (बहारेन २:२५.२९) हिने रौप्य, तर मेडिना अर्मिनो (इथिओपिया २:२७.५८) हिने कांस्य जिंकले.
लेह लडाखचा झेंडाअर्ध मॅरेथॉनमध्ये महिला गटात पहिल्या तिन्ही स्थानांवर लेह लडाखच्या धावपटूंनी कब्जा केला. यामध्ये स्टॅनझिन डोलकर (१:२५.५१), स्कारमा लांजेस (१:२७.०३) आणि टाशी लडोल (१:२९.३०) यांनी दबदबा राखला. पुरुषांमध्ये सावन बरवाल (१:०४.३७), हरमनजोत सिंग (१:०६.०३) आणि कार्तिक करकेरा (१:०७.२०) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पटकावले.
५:३० वाजता सुरु करा मॅरेथॉनभारतीय पूर्ण मॅरेथॉनमध्ये सेनादलाचा दबदबा कायम राहिला. अनिश थापा (२:१७.२३), मान सिंग (२:१७.३७) आणि गोपी थोनाकल (२:१९.५९) यांनी अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य जिंकले.महाराष्ट्राच्या कालिदास हिरवेला (२:२०.२८) अवघ्या २९ सेकंदांनी चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. यावेळी, ऑलिम्पियन धावपटू गोपी याने मॅरेथॉन सुरू होण्याच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त केली. त्याने म्हटले की, ‘मुंबई मॅरेथॉन खूप मोठी स्पर्धा आहे. येथे मॅरेथॉन सुरू होण्याच्या वेळेत बदल केला पाहिजे. आमची मॅरेथॉन जेव्हा सुरू होते, तेव्हा वातावरण काहीसे गरम होते. त्यामुळे आम्हाला वेळेत सुधारणा करणे कठीण होते. आमची पूर्ण मॅरेथॉन पहाटे किमान ५:३० वाजता सुरू व्हावी. यासाठी हौशी धावपटूंची शर्यत आमच्यानंतर करावी. याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल.’ महिलांमध्ये निरमाबेन ठाकोर, सोनिका परमार आणि सोनम यांनी अनुक्रमे पहिले तीन स्थान पटकावले. या तिघींनीही स्पर्धेच्या वेळेबाबत नाराजी व्यक्त करताना मॅरेथॉन लवकर सुरू करण्याबाबत मत मांडले.
मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बाल सिंग चहल यांनी सलग २०व्या वर्षी मुंबई मॅरेथॉनमध्ये अर्ध मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. २००४ सालापासून सुरू झालेल्या मुंबई मॅरेथॉनमध्ये त्यांनी यंदा २ तास २० मिनिटांची वेळ देत २१ किमी अंतराची अर्ध मॅरेथॉन पूर्ण केली.