मुंबई : मुंबई मॅरेथॉनमध्ये यंदाही अपेक्षेप्रमाणे आफ्रिकन धावपटूंचे वर्चस्व राहिले. पुरुषांमध्ये केनियाच्या कॉलमस लॅगट याने, तर महिलांमध्ये इथियोपियाच्या वॉर्कनेश अलेमू हिने बाजी मारली. त्याचवेळी भारतीयांमध्ये नितेंद्रसिंग रावत आणि सुधा सिंग यांनी अनुक्रमे पुरुष व महिला गटात वर्चस्व राखताना दोहा येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्रताही मिळवली.यंदा पुरुष गटात अव्वल दहामध्ये एकाही भारतीय धावपटूंना स्थान मिळवता न आल्याने यजमानांची निराशा झाली. मुख्य मॅरेथॉनच्या दोन्ही गटांमध्ये अनपेक्षित निकालांची नोंद करताना कॉलमस आणि अलेमू यांनी सुवर्ण जिंकले. पुरुष गटात केनियाच्या कॉसमस याने इथियोपियाच्या धावपटूंचे वर्चस्व मोडताना २:०९:१५ अशी बाजी मारली. कॉलमस याने २०१६ मध्ये सेविला मॅरेथॉन जिंकली होती. त्याने अखेरच्या दहा मिनिटांमध्ये वेग वाढवताना सहज बाजी मारली. विशेष म्हणजे त्याची कामगिरी मुंबई मॅरेथॉनमध्ये दुसºया क्रमांकाची सर्वोत्तम वेळ ठरली. केनियाच्याच गिडियोन किपकेटर याच्या नावावर २:०८:३५ सेकंदाच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद आहे. २०१६ साली किपकेटर याने हा विक्रम रचला होता.त्याचवेळी आयच्यू बॅनटाय (२:१०:०५) आणि सुमेत अकलन्यू (२:१०:१४) या इथियोपियाच्या धावपटूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पटकावले. धक्कादायक बाब म्हणजे, ज्याच्याकडून जेतेपदाची अपेक्षा होती, तो इथियोपियाचा अबेरा कुमा २:१३:१० अशा वेळेसह सातव्या क्रमांकावर राहिला.महिलांमध्ये पहिल्या तिन्ही स्थानांवर कब्जा करत इथियोपियाच्या धावपटूंनी मुंबई मॅरेथॉनमध्ये आपला दबदबा राखला. वॉर्कनेश अलेमू हिने अनपेक्षित निकाल नोंदवत गतविजेती अमाने गोबेना हिला मागे टाकून सर्वांना चकित केले. अलेमूने २:२५:४५ अशी वेळ नोंदवून बाजी मारली. अखेरच्या पाच मिनिटांमध्ये अलेमूने कमालीचा वेग वाढवताना सर्वांनाच मागे टाकले. या वेळी गोबेनालाही तिला गाठण्यात यश आले नाही.अलेमूच्या धडाक्यापुढे गोबेना हिला २:२६:०९ अशा वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. इथियोपियाच्याच बिर्के देबेले हिने २:२६:३९ वेळेसह कांस्य जिंकले. त्याचवेळी पुरुष गटात भारतीय धावपटूंना अव्वल दहामध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले असले, तरी ही कसर महिला गटात सुधा सिंगने भरून काढली. तिने एकूण क्रमवारीत आठवे स्थान पटकावत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.>मुख्य मॅरेथॉनच्या भारतीय गटात आशियाई क्रीडा पदक विजेती सुधा सिंग व नितेंद्रसिंग रावत यांनी अनुक्रमे महिला व पुरुष गटाचे सुवर्ण जिंकतानाच, दोहा येथे होणाºया जागतिक अजिंक्यपद स्पर्धेची पात्रता मिळवली. महिलांच्या एकूण क्रमवारीत आठव्या स्थानी राहिलेल्या सुधाने २:३४:५६ अशी वेळ नोंदवली.जागतिक स्पर्धेसाठी २ तास ३६ मिनिटांच्या वेळेचा निकष होता. त्याचबरोबर सुधाने आपली सर्वोत्तम वेळही नोंदवली. याआधी २:३५:३५ अशी तिची सर्वोत्तम कामगिरी होती. महाराष्ट्रची ज्योती गवते २:४५:४८ वेळेसह दुसºया स्थानी, तर लडाखची जिगमेट डोलमा ३:१०:४३ वेळेसह तिसºया स्थानी राहिली.पुरुषांमध्ये भारतीय सेनादलाने वर्चस्व राखताना अव्वल तिन्ही स्थानांवर कब्जा केला. नितेंद्रसिंग रावत याने सहज बाजी मारत जागतिक स्पर्धेची पात्रता मिळवली. पुरुषांसाठी जागतिक स्पर्धेचे तिकीट मिळवण्यासाठी २ तास १६ मिनिटांची वेळ नोंदवणे आवश्यक होते. मात्र, नितेंद्रने २ तास १५ मिनिटे ५२ सेकंदात मॅरेथॉन पूर्ण केली. या वेळी त्याने गतविजेत्या गोपी थोनकलचे आव्हानही परतावले. गोपीला २:१७:०३ अशा वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. तसेच करण सिंग याने २:२०:१० वेळ नोंदवून कांस्य पटकावले.
मुंबई मॅरेथॉन गाजवली आफ्रिकन धावपटूंनी, केनिया, इथियोपियाचे वर्चस्व कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 2:43 AM