मुंबई : मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषांमध्ये महाराष्ट्र पोलिस आणि महिलांमध्ये शिव ओम या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.
पुरुषांच्या 'ड' गटात महाराष्ट्र पोलिसांनी देना बँकेला ३२-२० असे पराभूत करत गटविजेते म्हणून बाद फेरी गाठली. याच गटात देना बँकेने अग्निशमन दलावर २९-१३ असा दुसरा विजय मिळवीत या गटातील दुसरा संघ म्हणून बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. 'क' गटात मुंबई बंदरने मुं. महानगर पालिकेला २५-२४ असे चकत बाद फेरी गाठली. शुभम कुंभार,संतोष पाष्टे,मनोज बेंद्रे या विजयाचे शिल्पकार ठरले. पालिकेने उत्तरार्धात आकाश गायकवाड, सुनील मोकलं, सिद्धेश यांच्या खेळाने काहीकाळ आपल्याकडे आघाडी घेतली होती, पण ती त्यांना टिकविता आली नाही. या पराभवाने त्यांना साखळीतच गारद व्हावे लागले.
स्पर्धेच्या 'अ' गटातून युनियन बँकेने सेन्ट्रल बँकेला ३८-२२असे नमवत या गटातून प्रथम येत बाद फेरी गाठली, तर सेन्ट्रल बॅँकेने देखील दुसरे येत बाद फेरी गाठली. युनियन बँकेकडून प्रतीक किरवे, अजिंक्य पवार, राजेश बेंदूर, नितीन भोगले यांचा तर सेन्ट्रल बँकेकडून सुशांत साईल, आकाश अडसूळ यांचा खेळ छान झाला. ब गटातून भारत पेट्रोलियमने आज दोन विजय मिळवीत बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले. त्यांनी प्रथम आर के इंजि.चा ३०-१३, तर नंतर माझगाव डॉकचा २३-१५असा पराभव केला. दोन्ही सामन्यात पेट्रोलीयमकडून आकाश पिकलमुंडे, रोहन उके, अक्षय बर्डे, नितीन शिंदे यांनी चढाई पकडीचा उत्कृष्ट खेळ केला.
महिलांच्या 'अ' गटात महात्मा गांधी संघाने स्वराज्यचा ३०-१६ असा पराभव करीत या गटातून प्रथम,तर स्वराज्यने द्वितीय क्रमांक मिळवीत बाद फेरी गाठली. पूजा किणी, तृप्ती सोनावणे, अक्षदा म्हात्रे यांचा खेळ महात्मा गांधींच्या विजयात महत्वाचा ठरला. स्वराज्यची श्रुतिका घाडीगावकर एकाकी लढली. ब गटात शिव ओमने शिवशक्ती या बलाढ्य संघाला १६-१५ असे चकवित या गटात प्रथम क्रमांक मिळविला, तर शिवशक्तीला द्वितीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. मध्यांतराला शिव ओम् ने ८-७अशी घेतलेली आघाडी या सामन्यात महत्वपूर्ण ठरली. या सामन्यात एकाही लोणची नोंद झाली नाही. रेणुका मिसाळ, सोनाली साळुंखे शिव ओम् कडून, तर रेखा सावंत, पौर्णिमा जेधे यांनी शिवशक्ती कडून उत्तम खेळ केला. अ गटात रायगडच्या कर्नाळा स्पोर्ट्सने मोनाली घोंगे,समिक्षा पाटील, तेजा सपकाळ यांच्या चतुरस्त्र खेळाच्या बळावर पहिला विजय मिळविताना पालघरच्या विश्वशांतीला ३६-२०असे नमवले खरे, पण दोन सामन्यात पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांच्यावर साखळीतच गारद होण्याची वेळ आली. 'ब' गटात चिपळूण स्पोर्ट्सने श्रद्धा पवार, गौरी कदम यांच्या चढाई पकडीच्या खेळाच्या जोरावर टागोर नगरचा २७-२२ असा पाडाव करीत बाद फेरी गाठण्याच्या आशा निर्माण केल्या आहेत.