मुंबई : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २५ मार्च २०१८ रोजी मुंबई - पुणे सायकल शर्यतीचा थरार पहायला मिळणार आहे.
भारतामध्ये प्रतिष्ठेची व अत्यंत खडतर समजल्या जाणा-या या राष्ट्रीय स्तरावरील शर्यतीचे हे ५२ वे वर्ष असून क्रीडा जागृती व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सायकल जगतातील अव्वल नाव असलेल्या जायंट व स्टारकेन च्या सहकार्याने या शर्यतिचे आयोजन करत आहे.
या वर्षात राष्ट्रीय एम टी बी व ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते, तर राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत पदतालिकेत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर राहिला.
विजेत्या व सहभागी सायकलपट्टूंना यावर्षी एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम देणारी ही देशातील एकमेव सायकल शर्यत आहे. भारतीय सायकलिंग महासंघाकडे नोंदणी असलेल्या महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक सायकलपटूस या शर्यतिमधील सहभागासाठी प्रत्येकी रुपये १,००० देण्यात येणार आहेत. ही शर्यत गेल्यावर्षापासून दोन टप्प्यात होत असून पहिला टप्पा मुंबई ते खंडाळा हा आहे तर दुसरा टप्पा खंडाळा ते पुणे असा असेल. दोनही टप्प्याची वेळ एकत्रित करुन या शर्यतिचा विजेता घोषित करण्यात येईल. शर्यत जलद होण्यासाठी विविध टप्यावर रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. पनवेल, खोपोली या टप्प्यावर येणा-या पहिल्या तीन सायकलपटूंना रोख पुरस्कार देण्यात येणार आहेत. खडतर असा बोर घाट प्रथम पार करणा-या खेळाडूला घाटांचा राजा या किताबाने सन्मानित करण्यात येणार आहे.