टक: शेवटच्या दिवशी बलविंदर संधूने (३/३५) केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने दिल्लीचा दुसरा डाव २३६ धावांत गुंडाळून तब्बल २०४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह मुंबईने साखळी फेरीतील अपयश मागे टाकून दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात मुंबईसमोर बलाढ्य गतविजेत्या कर्नाटकचे तगडे आव्हान असेल.साखळी फेरीतील कामगिरी पाहता मुंबई बाद फेरी तरी गाठणार का याबाबत अनिश्चितता होती. मात्र बाद फेरीपासून मुंबईने आपला ‘खडूस’पणा दाखवण्यास सुरुवात केली. कटक येथे पार पडलेल्या या सामन्याच्या शेवटच्या दिवशी दिल्लीने ४ बाद ११० या धावसंख्येवरुन खेळण्यास सुरुवात केली. सामन्यावर पावसाचे सावट असल्याने मुंबईकरांनी आक्रमक खेळण्यावर भर दिला.शार्दुल ठाकूरने मुंबईला झटपट यश मिळवून देताना मनन शर्माला (१६) बाद केले. यावेळी खेळपट्टीवर आलेल्या धडाकेबाज वीरेंद्र सेहवागवर सर्वांचे लक्ष लागून राहिले. संघाची नाजूक स्थिती ओळखून सेहवागने आक्रमणाला मुरड घालून सावध सुरुवात केली. मात्र ५६व्या षटकातील पाचव्या चेंडूवर संधूने सेहवागचा त्रिफळा उखाडून दिल्लीच्या उरल्या सुरल्या आशा देखील संपुष्टात आणल्या. सेहवाग बाद झाल्यानंतर ६ बाद १५० अशा अडचणीत आलेल्या दिल्लीची शेवटची फळी संधू समोर गडगडली. राहूल यादवला (१३) संधूने बाद केल्यानंतर हरमीत सिंगने जम बसलेल्या रजत भाटियाची यष्टी उखाडून दिल्लीची ८ बाद १७२ अशी अवस्था केली. भाटियाचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने दिल्लीकडून सर्वाधिक ४९ धावा फटकावताना १२२ चेंडुमध्ये ८ चौकारांसह १ षटकार खेचला. सांगवानने अखेरपर्यंत नाबाद राहत २६ धावांसह दिल्लीचा पराभव लांबवला. त्याने सुमीत नरवालसह (९) नवव्या विकेटसाठी २७ धावांची भागीदारी केल्यानंतर परवींदर अवाना (२४) सोबत दहाव्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली.ठाकूर आणि संधू यांनी प्रत्येकी ३ बळी मिळवताना दिल्लीला नमवण्यात मोलाची भूमिका बजावली. तर मोटा आणि हरमीत यांना प्रत्येकी २ बळी घेण्यात यश आले. संपुर्ण सामन्यात ८ बळी घेऊन मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावलेल्या शार्दुल ठाकूर सामनावीर ठरला. (वृत्तसंस्था)संक्षिप्त निकाल:मुंबई (पहिला डाव): सर्वबाद १५६ धावा, दिल्ली (पहिला डाव): सर्वबाद १६६ धावा, मुंबई (दुसरा डाव): सर्वबाद ४५० धावा, दिल्ली (दुसरा डाव): चंद त्रि. गो. मोटा ३१, गंभीर पायचीत गो. ठाकूर ३४, शिवम पायचीत गो. मोटा ०, भाटिया त्रि. गो. हरमीत ४९, मन्हास झे. तरे गो. ठाकूर ०, मनन झे. लाड गो. ठाकूर १६, सेहवाग त्रि. गो. संधू १९, यादव झे. पाटील गो. संधू १३, नरवाल झे. व गो. हरमीत ९, सांगवान नाबाद २६, अवाना झे. यादव गो. संधू २४. अवांतर - १५. एकूण: ८७ षटकांत सर्वबाद २३६ धावा.गोलंदाजी: ठाकूर २४-१०-५९-३; संधू १७-६-३५-३; मोटा १५-५-५५-२; नायर ५-१-११-०; हरमीत २०-८-५५-२; लाड ४-२-९-०; यादव २-१-४-०. सामनावीर: शार्दुल ठाकूर
मुंबई उपांत्य फेरीत
By admin | Published: February 21, 2015 3:33 AM