- रोहित नाईक, मुंबई
फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करण्यात आलेल्या अपयशानंतर गोलंदाजांनी भेदक मारा केल्याने मुंबई इंडियन्सने विजयाचा ‘षटकार’ नोंदवताना दिल्ली डेअरडेव्हिल्सचा १४ धावांनी पराभव केला. यासह १२ गुणांची कमाई करताना मुंबईकरांनी गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ८ बाद १४२ अशी मजल मारली. या वेळी मुंबईचा विजयी अश्वमेध दिल्लीकर रोखणार, अशीच शक्यता होती. परंतु, गोलंदाजांनी ठराविक अंतराने बळी घेत दिल्लीकरांना १२८ धावांवर रोखले. मिशेल मॅक्लेनघनने २४ धावांत ३ बळी घेत दिल्लीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तसेच, यंदाच्या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या मिशेल जॉन्सनने एक षटक निर्धाव टाकत दिल्लीकरांना जखडवून ठेवले.
जसप्रीत बुमराह (२), हार्दिक पांड्या (१) व हरभजन सिंग यांनीही दिल्लीवर जबरदस्त दडपण आणले. एक वेळ दिल्लीची सातव्या षटकात ६ बाद २४ धावा अशी केविलवाणी स्थिती होती. येथेच मुंबईचा विजय निश्चित झालेला. परंतु, पहिला आयपीएल सामना खेळत असलेल्या कागिसो रबाडाने (३९ चेंडूंत ४४) अष्टपैलू ख्रिस मॉरिससह (४१ चेंडंूत नाबाद ५२) ९१ धावांची भागीदारी करत दिल्लीच्या आशा कायम ठेवल्या होत्या. परंतु, बुमराहने १९ व्या षटकात रबाडाला बाद करून सामना पूर्णपणे मुंबईच्या बाजूने झुकवला. तत्पूर्वी, धावांचा पाठलाग करताना सलग पाच विजयांची नोंद केलेल्या मुंबई इंडियन्सने ८ बाद १४२ अशी मजल मारली. आक्रमक सुरुवात केल्यानंतर ठराविक अंतराने बळी गेल्याने मुंबईची तगडी फलंदाजी यावेळी अपयशी ठरली. जोस बटलर (२८) आणि किरॉन पोलार्ड (२६) यांच्या फटकेबाजीनंतर हार्दिक पांड्याने (२४) काही प्रमाणात आक्रमकता दाखवल्याने मुंबईला समाधानकारक मजल मारता आली.