जयंत कुलकर्णी,पुणे- कर्णधार म्हणून स्टीव्ह स्मिथची पदार्पणातच अर्धशतकी खेळी व त्याने अजिंक्य रहाणे आणि बेन स्टोक्ससोबत केलेल्या भागीदारीच्या बळावर इंडियन प्रीमिअर लीगच्या सलामीच्या लढतीत रायजिंग पुणे सुपरजायंट संघाने मुंबई इंडियन्सचा ७ गडी व एक चेंडू राखून पराभव करताना पुणेच सुपर असल्याचे सिद्ध केले. त्याचबरोबर याआधी घरच्या मैदानावर झालेल्या पराभवाची परतफेडही पुणे संघाने गुरुवारी केली.अखेरच्या षटकात रायजिंग पुणे सुपरजायंट संघाला ६ चेंडूंत १३ धावांची गरज होती; पहिल्या तीन चेंडूंत प्रत्येकी १ धाव घेतल्यानंतर स्टीव्ह स्मिथने पोलार्डला सलग दोन षटकार ठोकताना रायजिंग पुणे सुपर जायंट संघाला १९.५ षटकांत ३ बाद १८७ धावा उभारून देताना विजयावर शिक्कामोर्तब केले. स्टीव्ह स्मिथने ५४ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ८४ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने ३४ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ६0 आणि बेन स्टोक्सने २१ धावांचे योगदान दिले. महेंद्रसिंह धोनी १२ धावांवर नाबाद राहिला. विजयासाठी पाठलाग करणाऱ्या रायजिंग पुणे सुपरजायंट संघाला हार्दिक पंड्याला ३ चौकार व साऊदीला षटकार ठोकणाऱ्या अजिंक्य रहाणेने जोरदार सुरुवात करून दिली. रहाणेने मिचेल मॅग्लेनन याला बॅकवर्ड पॉइंटला षटकार व लेटकटचा चौकार मारत पुणे संघाला पॉवर प्लेमध्ये १ बाद ५९ धावा फटकावून दिल्या. त्याने हार्दिक पांड्याला मिडविकेटवर चौकार ठोकताना २७ चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. त्यात चार चौकार व २ षटकारांचा समावेश होता. रहाणेने कृणाल पंड्यालाही लाँगआॅनला षटकार ठोकत पुणे संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत ठेवल्या; परंतु ११ व्या षटकात टीम साऊदीला पूल मारण्याच्या प्रयत्नात तो राणाकडे झेल देऊन बाद झाला. बाद होण्यापूर्वी त्याने कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या साथीने ४२ चेंडूंत ५८ धावांची भागीदारी केली. अजिंक्य बाद झाल्यानंतर, मॅकग्लेननच्या गोलंदाजीवर नितीश राणाकडून जीवदान मिळणाऱ्या स्टीव्ह स्मिथने किल्ला लढवताना पोलार्डला फाइन लेगला चौकार व नंतर लाँगआॅनला षटकार ठोकत त्याचा समाचार घेतला. त्याने १५ व्या षटकात साऊदीच्या गोलंदाजीवर २ धावा घेत ३७ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह अर्धशतक पूर्ण केले. स्मिथने बेन स्टोक्सच्या साथीने ३१ चेंडूंत ५0 धावांची भागीदारी केली. १९ व्या षटकांत बुमराहच्या गोलंदाजीवर धोनीला साऊदीने जीवदान दिले. अखेर स्मिथने पोलार्डला २ षटकार ठोकताना पुणे संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.त्याआधी हार्दिक पंड्याने १५ चेंडूंतच ४ षटकार आणि एका चौकारांसह ३५ धावांची खेळी करताना मुंबई इंडियन्सला २0 षटकांत ८ बाद १८४ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. एकवेळ इम्रान ताहिर आणि रजत भाटिया यांच्या सुरेख गोलंदाजीमुळे रायजिंग पुणे सुपर जायंट संघ मुंबईला रोखणार अशीच स्थिती होती; परंतु हार्दिक पंड्याच्या स्फोटक फलंदाजीने सर्वच चित्र पालटले. हार्दिकने २0 वे षटक टाकणाऱ्या अशोक दिंडाच्या अखेरच्या षटकात ४ षटकार व एक चौकार वसूल केला. या षटकात मुंबईने ३0 धावांची वसुली केली. त्याच्याशिवाय जोस बटलरने १९ चेंडूंत ३ षटकार व ३ चौकारांसह ३८, नितीश राणा याने २७ चेंडूत एक चौकार व २ षटकारांसह ३४ धावा केल्या. केरॉन पोलार्डने १७ चेंडूंत ३ चौकार व एका षटकारासह २७ धावा केल्या. रायजिंग पुणे सुपरजायंट संघाकडून इम्रान ताहिरने २८ धावांत ३ गडी बाद केले. रजत भाटियाने १४ धावांत २ गडी बाद केले.>धावफलक :मुंबई इंडियन्स : पार्थिव पटेल त्रि. गो. इम्रान ताहिर १९, जोस बटलर पायचीत गो. इम्रान ताहिर ३८, रोहित शर्मा त्रि.गो. इम्रान ताहिर ३, नितीश राणा झे. रजत भाटिया गो. अॅडम झम्पा ३४, अंबाती रायडू झे. व गो. रजत भाटिया १0, कृणाल पंड्या झे. धोनी गो. रजत भाटिया ३, केरॉन पोलार्ड झे. अग्रवाल गो. स्टोक्स २७, हार्दिक पंड्या नाबाद ३५, टीम साऊथी धावबाद ७, मॅकग्लेनन नाबाद 0. एकूण : २0 षटकांत ८ बाद १८४. गोलंदाज : अशोक दिंडा ४/0/५७/0, बेन स्टोक्स ४/0/३६/१, इम्रान ताहीर ४/0/२८/३, अॅडम झम्पा ३/0/२६/१, रजत भाटिया ३/0/१४/२.रायजिंग पुणे सुपर जायंट : अजिंक्य रहाणे झे. राणा गो. साऊदी ६0, मयंक अग्रवाल झे. शर्मा गो. मॅकग्लेनन ६, स्टीव्ह स्मिथ नाबाद ८४, बेन स्टोक्स झे. साऊदी गो. हार्दिक पंड्या २१, महेंद्रसिंग धोनी नाबाद १२. एकूण : १९.५ षटकांत ३ बाद १८७. गोलंदाजी : टीम साउदी ४/0/३४/१, हार्दिक पंड्या ४/0/३६/१, मिचेल मॅग्लनन ४/0/३६/१, जसप्रीत बुमराह ४/0/२९/0, कृणाल पंड्या २/0/२१/0, पोलार्ड : १.५/0/३0/0
मुंबईविरुद्ध पुणेच सुपर
By admin | Published: April 07, 2017 3:45 AM