आकाश नेवे/ऑनलाइन लोकमत
इंदोर, दि. 20 - हाशिम आमलाने टी २०तही आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले. तब्बल ६ उत्तुंग षटकार लगावत किंग्ज इलेव्हन पंजाबला १९८ ची धावसंख्या गाठून दिली. मात्र बॅट विरुद्ध बॅट अशी लढत झालेल्या या सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी आमलाच्या मेहनतीवर पाणी फेरले. पार्थिव पटेल, तुफानी खेळी करणारा जोश बटलर आणि मुंबईचे खास अस्त्र नितीश राणा यांनी मुंबईला सहजतेने विजय मिळवून दिला.पंजाबने काहीशी सावध सुरूवात केली. साहा आणि मार्श यांनी आमलाला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र मार्श फटकेबाजीच्या नादात तर साहा दबावात बाद झाला. मात्र त्याचा आमलावर काहीही परिणाम झाल्याचे दिसून आले नाही. त्याने आपल्या खास शैलीत उत्तुंग षटकार आणि खणखणीत चौकार लगावणे सुरूच ठेवले. साहानंतर फलंदाजीला मॅक्सवेल आला. आणि सामना काहीसा पंजाबच्या बाजुने झुकला. मॅक्सवेल आणि आमला या जोडीने १६ व्या आणि १७ व्या या दोन्ही षटकांत तब्बल ५० धावा कुटल्या. मिशेल मॅक्लेगनचे षटक हे या आयपीएलमधील दुुसऱ्या क्रमांकाचे महागडे षटक ठरले. त्याने तब्बल २८ धावा दिल्या. सर्वात महागडे षटक टाकण्याचा विक्रम अशोक दिंडाच्या नावावर आहे. त्याने मुंबई विरोधात एका षटकात ३० धावा दिल्या होत्या. आमलाने पंजाबला १९८ धावसंख्या गाठून दिली. आमलाचे हे टी २०मधील पहिलेच शतक आहे. मुंबईच्या सलामीवीरांनी चौकार आणि षटकारांच्या आतषबाजीनेच आपल्या डावाची सुरूवात केली. जोश बटलर याने डावाच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारुन खाते उघडले. तर लगेचच तिसऱ्या चेंडूवरही त्याने षटकार लगावत आपले इरादे स्पष्ट केले. मुंबईने चार षटकांतच ५१ धावा कुटल्या. मुंबईने पॉवरप्लेमध्ये ८२ धावा केल्या.सहाव्या षटकात स्टाओनीसने पंजाबला पहिला ब्रेक थ्रु मिळवून दिला. पार्थिवला बाद करत त्याने सलामीची जोडी फोडली. मात्र मुंबईवर त्याचा परिणाम झाला नाही. नितीश राणा याने त्याच वेगाने फटकेबाजी करत संघाला विजय मिळवून दिला. पंजाबने अखेरच्या वेळी इशांत शर्माला विकत घेतले. मात्र या सामन्यात त्याने ४ षटकांत ५८ धावा दिल्या. मुंबईच्या लसीथ मलिंगा यानेही या सामन्यात ४ षटकांत ५८ धावा देण्याची कामगिरी केली. आयपीएल १० मध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा देण्याच्या विक्रम या दोघांनी आपल्या नावे केला. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे आमलला गवसलेला सूर होय. मात्र त्याचसोबत पंजाब संघाला एकसंघ कामगिरी करता आली नाही. या विजयासह मुंबई इंडियन्सने गुणतालिकेत अग्रस्थानावर झेप घेतली आहे. मुंबईने सहा सामन्यात पाच विजय मिळवले आहेत. या सामन्यात लगावलेले षटकारकिंग्ज इलेव्हन पंजाब - ९ हाशिम आमला ६ग्लेन मॅक्सवेल ३मुंबई इंडियन्स १५जोश बटलर ५नितीश राणा ७ हार्दिक पांड्या १