मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध मिळालेल्या विजयामुळे मुंबई इंडियन्सचा संघ बुधवारी हैदराबादविरुद्ध आत्मविश्वासाने मैदानात उतरला.हा सामना दोन्ही संघांतील युवा खेळाडूंदरम्यान असणार आहे. नीतिश राणा व हार्दिक पंड्या एका बाजूला असणार आहेत, तर दुसऱ्या बाजूला अफगाणिस्थानचा लेग स्पिनर राशिद खान असणार आहे. राशिदने आतापर्यंत आपल्या गोलंदाजीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.मुंबई मागील काही वर्षांपासून आयपीएलमध्ये आपल्या खराब सुरुवातीसाठी प्रसिद्ध झाला आहे. मात्र, यावेळी राणा व हार्दिक पंड्या यांच्या फलंदाजीच्या जोरावर दुसराच सामना जिंकून चांगली सुरुवात केली आहे. हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल यानेही तीन बळी घेत चांगली कामगिरी केली आहे.मुंबईचा हा तिसरा सामना आहे; मात्र त्यांच्यासाठी ही लढत सोपी असणार नाही. सनरायजर्सचा संघ चांगल्या फॉर्ममध्ये असून, त्यांनी पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. मुंबईचे युवा खेळाडू चांगली कामगिरी करत असल्यामुळे मुंबईचे व्यवस्थापन आनंदी आहे. मूळचा दिल्लीचा असणाऱ्या राणा याने पोलार्ड व रोहित शर्मा यांच्यासारखे अनुभवी खेळाडू बाद झाल्यानंतरही परिपक्वता दाखवली. पंड्याने ११ चेंडंूत २९ धावा करत आपल्यावर संघ व्यवस्थापनाने दाखविलेला विश्वास खरा करून दाखविला.मुंबईच्या पोलार्ड, रोहित व हरभजन सिंग या अनुभवी खेळाडूंनी चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. लसिथ मलिंगाने मागील सामन्यात चांगली गोलंदाजी केली आहे, तर शेवटच्या षटकात जसप्रीत बुमराह याने टिच्चून मारा करत प्रतिस्पर्धी संघाला जखडून ठेवले होते. मुंबई मिशेल मॅकलीगनच्या जागेवर टीम साऊथीला खेळवू शकते. (क्रीडा प्रतिनिधी) - मुंबईच्या गोलंदाजीला समर्थपणे तोंड देण्यास हैदराबादचे फलंदाज सक्षम आहेत. डेव्हिड वॉर्नर व युवराजसिंग यांचे त्यांच्यासमोर आव्हान असेल. गोलंदाजीत फिरकी गोलंदाज राशिदच्या रूपाने हुकमाचा एक्का हैदराबादकडे आहे. त्याने दोन सामन्यांत पाच बळी मिळविले आहेत.
सनरायजर्स हैदराबादविरुद्ध आत्मविश्वासाने उतरणार मुंबई
By admin | Published: April 12, 2017 3:36 AM