मुंबई : दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंग्लंडला सराव सामन्यात मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) एकादश संघाविरुद्ध विजयासाठी चांगलेच झुंजावे लागले. अखेरच्या क्षणी मुंबईकरांवर दडपण राखण्यात यशस्वी ठरल्याने इंग्लंडने १४ धावांनी रोमांचक बाजी मारली.टी-२० क्रिकेटमध्ये कोणताही संघ दुबळा नसतो, याची प्रचीती या सामन्यात आली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने २० षटकांत ८ बाद १७७ अशी समाधानकारक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकरांना २० षटकांत ६ बाद १६३ धावाच काढता आल्या. या सामन्यात जेम्स विन्स, जोस बटलर, आदिल रशीद व डेव्हिड विले मुंबईकडून खेळले. जय बिस्टा - श्रेयश अय्यर यांनी ५७ धावांची सलामी देत चांगली सुरुवात केली. अय्यर (१६) बाद झाल्यानंतर बिस्टा - विन्स जोडीने मुंबईला सावरण्याले. बिस्टाने ३७ चेंडंूत ५ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा फटकावल्या, तर विन्सने ३८ चेंडूंत ४ चौकार व एका षटकारासह ४५ धावांची खेळी केली. जोस बटलरने (२५) छोटेखानी आक्रमक खेळी केली. मात्र बटलर परतल्यानंतर मुंबईकर दबावाखाली खेळ उंचावण्यात अपयशी ठरले. रिसे टोपले व ख्रिस जॉर्डन यांनी प्रत्येकी २ बळी घेत मुंबईला नमवले. त्याआधी, ज्यो रुट (३४ चेंडूंत ४८ धावा), अॅलेक्स हेल्स (२३ चेंडूंत ३७ धावा), जेसन रॉय (२१ चेंडूंत ३२) व बेन स्टोक्स (२३ चेंडूंत ३०) यांच्या जोरावर इंग्लंडने समाधानकारक मजल मारली. डेव्हिड विलेने ३५ धावांत ३ बळी घेत इंग्लंडच्या धावसंख्येला ब्रेक लावला, तर शार्दुल ठाकूर व आदिल रशीद यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.(क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक :इंग्लंड : २० षटकांत ८ बाद १७७ धावा (ज्यो रुट ४८, अॅलेक्स हेल्स ३७, जेसन रॉय ३२, बेन स्टोक्स ३०; डेव्हिड विले ३/३५) वि. वि. एमसीए : २० षटकांत ६ बाद १६३ धावा (जय बिस्टा ५१, जेम्स विन्स ४५; रिसे टोपले २/२६, ख्रिस जॉर्डन २/३४).
मुंबईकरांनी साहेबांना झुंजवले
By admin | Published: March 15, 2016 3:20 AM