मुंबई : मुंबई शहरच्या दोन्ही संघांनी आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना ४५व्या राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो - खो स्पर्धेत अनुक्रमे कुमार व मुलींच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्याचप्रमाणे, ठाण्याच्या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करत आपली चमक दाखवली.चिपळून येथे महाराष्ट्र खो - खो संघटनेच्या मान्यतेने सुरु असलेल्या या स्पर्धेच्या कुमार गटात मुंबईने जळगावचा २१-९ असा एक डाव व १२ गुणांनी फडशा पाडला. पहिल्याच डावात मुंबईने २१-४ अशी एकतर्फी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला. यानंतर जळगावने पुनरागमन करण्याचे प्रयत्नही केले नाहीत. दुसºया डावातही मुंबईच्या मुलांनी ५-० असे वर्चस्व राखत दणदणीत बाजी मारली. शुभम शिगवण, जितेश नेवाळकर यांचा अष्टपैलू खेळ मुंबईच्या विजयात निर्णायक ठरला. आयुष गुरव आणि सनी तांबे यांनीही जबरदस्त आक्रमण करताना जळगावची दाणादाण उडवली. अन्य सामन्यात मुंबई उपनगरच्या कुमार संघाने कसलेल्या रत्नागिरीचे आव्हान १६-९ असे ७ गुणांनी परतावले. कर्णधार निहार दुबळे, सिध्देश थोरात आणि अक्षय कदम यांनी उपनगरचा विजय साकारला.मुलींच्या गटात मुंबईने सहज विजयी आगेकूच करताना धुळ्याचा २४-८ असा एक डाव १६ गुणांनी धुव्वा उडवला. मध्यंतराला मुंबईकरांनी २४-३ अशी भलीमोठी आघाडी घेत आपला विजय निश्चित केला होता. यानंतरही मुंबईकरांनी आपली पकड अधिक घट्ट करत धुळ्याची आव्हान संपुष्टात आणले. वैष्णवी परब, सायली म्हैसधुणे आणि शिवानी गुप्ता यांच्या जोरावर मुंबईने बाजी मारली. त्याचवेळी, रत्नागिरीने अनपेक्षित निकालाची नोंद करताना बलाढ्य मुंबई उपनगरला १७-१३ असा ४ गुणांनी धक्का दिला. पहिलेदोन्ही डाव अनुक्रमे ४-४, ६-६ असे बरोबरीत राहिल्यानंतर तिसºयाडावात रत्नागिरीने ७-३ अशी बाजी मारली. अपेक्षा सुतारने अप्रतिम अष्टपैलू खेळ करत रत्नागिरीचा एकाहाती विजय साकारला. उपनगरच्या आरती कदमची झुंजार खेळी अपयशी ठरली.।ठाण्याचे दुहेरी कूच...कुमार गटामध्ये ठाणे संघाने उस्मानाबादचे आव्हान १३-१० असे ३ गुणांनी परतावून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्या डावात एकतर्फी आघाडी घेत ठाणेकरांनी सामन्यावर घट्ट पकड मिळवली होती. मुलींच्या गटातही ठाण्याने दणदणीत विजय मिळवताना औरंगाबादचा १०-५ असा एक डाव आणि ५ गुण राखून फडशा पाडला. रेश्मा राठोड, गितांजली नरसाळे आणि वृत्तिका सोनावणै यांनी ठाण्याच्या विजयामध्ये मोलाचे योगदान दिले.
मुंबईकरांची उपांत्यपूर्व फेरीत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 2:25 AM