राजकोट : १७ वर्षीय युवा सलामीवीर पृथ्वी शॉने पदार्पणात झळकावलेल्या तडाखेबंद शतकाच्या जोरावर मुंबईने रणजी स्पर्धेत विक्रमी ४६व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या डावात पृथ्वीने १७५ चेंडूत १२० धावांची जबरदस्त खेळी केली. या जोरावर मुंबईने ४ फलंदाजांच्या मोबदल्यात अखेरच्या दिवशी २५१ धावांचे लक्ष्य गाठले. संघाला अंतिम फेरी गाठून देण्यात मोलाचे योगदाने दिलेल्या पृथ्वीला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.तीन वर्षांपूर्वी मुंबईत शालेय क्रिकेटमध्ये दबदबा असलेल्या रिझवी स्प्रिंगफिल्डकडून खेळताना पृथ्वीने ५४६ धावांची विक्रमी खेळी करुन सर्वांचे लक्ष वेधले होते. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काही दिवसांनीच पृथ्वीने ही विक्रमी खेळी केल्याने त्याची तुलना तेंडुलकरशी होत होती. तर, आता रणजी पदार्पणात शतक केले असल्याने पुन्हा एकदा सचिनच्या आठवणी ताजा झाल्या आहेत. दरम्यान, १० जानेवारीपासून इंदोर येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात मुंबईपुढे गुजरातचे कडवे आव्हान असेल.तमिळनाडूने चौथ्या दिवशी आपला दुसरा डाव ६ बाद ३५६ धावांवर घोषित करून मुंबईला विजयासाठी २५१ धावांचे आव्हान दिले. परंतु, पृथ्वीच्या शानदार खेळीपुढे हे आव्हान सहजपणे पार करताना मुंबईने स्पर्धा इतिहासात ४६व्यांदा अंतिम फेरी गाठली. पाचव्या दिवशी बिनबाद ५ धावांवरून सुरुवात करताना पृथ्वी - प्रफुल वाघेला यांनी संघाला ९० धावांची सलामी दिली. वाघेला ६७ चेंडूत ३६ धावा काढून परतला. यानंतर पृथ्वीने अनुभवी श्रेयश अय्यरसह (४०) संघाला सावरताना दुसऱ्या विकेटसाठी ९१ धावांची भागीदारी केली. तर, तिसऱ्या विकेटसह सुर्यकुमार यादवसह (३४) शानदार ५७ धावांची भागीदारी करुन पृथ्वीने मुंबईला विजयासमीप नेले. मुंबईच्या विजयामध्ये निर्णायक कामगिरी केलेल्या पृथ्वीने दुसऱ्या डावात एकुण ३ अर्धशतकी भागीदारी केल्या. त्याने २७२ मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडताना १७५ चेंडूत १३ चौकार एका षटकारासह १२० धावा चोपल्या. दखल घेण्याची बाब म्हणजे वैयक्तिक ९९ धावांवर असताना पृथ्वीला विजय शंकरच्या गोलंदाजीवर जीवदान मिळाले. याचा पुरेपूर फायदा घेताना त्याने पदार्पणात शतक झळकावले. अखेर, मुंबईला विजयासाठी केवळ १० धावांची आवश्यकता असताना पृथ्वी फिरकी गोलंदाज औशिक श्रीनिवासच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटला झेल देऊन परतला. श्रीनिवासने सर्वाधिक २ बळी घेतले. तर, बाबा अपराजित आणि विजय शंकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. तमिळनाडू (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ३०५.मुंबई (पहिला डाव) : १५०.३ षटकांत सर्वबाद ४११ धावा.तमिळनाडू (दुसरा डाव) : ७८ षटकांत ६ बाद ३५६ धावा - घोषित.मुंबई (दुसरा डाव) : ६२.१ षटकात ४ बाद २५१ धावा (पृथ्वी शॉ १२०, श्रेयश अय्यर ४०; औशिक श्रीनिवास २३-७-७३-२)पृथ्वीचे शतक रिझवींना अर्पण...पृथ्वीच्या खेळीचा गर्व आहे. त्याने झळकावलेले शतक आम्ही रिझवी शिक्षण संस्थेचे दिवंगत सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी अबीस रिझवी यांना अर्पण करीत आहोत. त्याचे पदार्पण शानदार ठरले. आता त्याला मागे वळून पाहायचे नाही. पहिल्या डावात तो स्वत:च्या चुकीने बाद झाला. तेव्हा पृथ्वीने पुढच्यावेळी संधी मिळाल्यास ही चूक सुधारण्याचे आश्वासन दिले आणि त्याने स्वत:ला सिद्ध केले, असे पृथ्वीचे शालेय प्रशिक्षक राजू पाठक यांनी ‘लोकमत’ला सांगितले.९९ धावांवर जीवदान!या सामन्यात पृथ्वीला नशिबाने चांगलीच साथ दिली. वैयक्तिक ९९ धावांवर खेळत असताना पृथ्वीने फिरकीपटू विजय शंकरच्या गोलंदाजीवर शॉर्ट थर्ड मॅनला झेल दिला. परंतु, पंचानी हा चेंडू नोबॉल ठरविल्यानंतर पृथ्वीने मिळालेली संधी साधताना रणजी पदार्पणात शतक झळकावले. यासह त्याने रणजी पदार्पणात शतक झळकावणाऱ्या सचिन तेंडुलकर व अजिंक्य रहाणे यांसारख्या फलंदाजांच्या पंक्तीत स्थान मिळविले.