इंदूर : रणजी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात १०० धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर गतविजेत्या मुंबईकरांनी दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करताना गुजरातला आपल्या ‘खडूस’ खेळीचे दर्शन घडविले. युवा सलामीवीर पृथ्वी शॉच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर वेगवान सुरुवात केल्यानंतर तिसऱ्या दिवसअखेर मुंबईने ३ बाद २०८ धावांची मजल मारून १०८ धावांची आघाडी मिळवली.होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात गुजरातने पहिल्या डावात शतकी आघाडी मिळवून नियंत्रण राखले, परंतु यानंतर मुंबईने दुसऱ्या डावात दमदार सुरुवात केली. पुन्हा एकदा युवा पृथ्वीने जबरदस्त खेळी करताना गुजरातच्या गोलंदाजांना चोपण्यास सुरुवात केली. मात्र, आक्रमणाच्या नादात चिंतन गजाच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर तो यष्टिरक्षकाकडे झेल देऊन परतला. उपाहारापूर्वीच्या एक षटकाआधी तो बाद झाला. पृथ्वीने ३५ चेंडंूत ८ खणखणीत चौकारांसह ४४ धावांची वेगवान खेळी केली. त्याआधी सलामीवीर अखिल हेरवाडकर ३३ चेंडंूत १६ धावा काढून बाद झाला. या दोघांनी मुंबईला ५४ धावांची सलामी दिली.उपाहारानंतर श्रेयश अय्यर (८२) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद ४५) यांनी १२७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून मुंबईला सावरले. जम बसल्यानंतर अय्यरने आक्रमक पवित्रा घेतला, तर दुसरीकडून जबरदस्त संयम बाळगताना सूर्यकुमारने एक बाजू लावून धरली होती. गजाने पुन्हा एकदा मुंबईला मोठा धक्का देताना अय्यरला बाद केले. अय्यरने १३७ चेंडूंचा सामना करताना ९ चौकार व २ षट्कारांसह आपली खेळी सजवली. यानंतर सूर्यकुमार यादव आणि कर्णधार आदित्य तरे (नाबाद १३) यांनी कोणताही धोका न पत्करता गुजरातला यश मिळवू दिले नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने ६७ षटकांत ३ बाद २०८ धावांची मजल मारताना १०८ धावांची आघाडी मिळवली. चिंतन गजाने पुन्हा एकदा मुंबईची कोंडी करताना ५४ धावांत प्रमुख ३ फलंदाज बाद केले. (वृत्तसंस्था)धावफलकमुंबई (पहिला डाव) : ८३.५ षटकांत सर्वबाद २२८ धावा.गुजरात (पहिला डाव) : ६ बाद २९१ धावांवरून पुढे... चिराग गांधी झे. यादव गो. ठाकूर १७, रुष कलारिया पायचित गो. संधू २७, चिंतन गजा नाबाद ११, आर. पी. सिंग झे. अय्यर गो. संधू ८, हार्दिक पटेल झे. तरे गो. ठाकूर १. अवांतर - १७. एकूण : १०४.३ षटकांत सर्वबाद ३२८ धावा.गोलंदाजी : शार्दुल ठाकूर २९.३-६-८४-४; बलविंदर संधू २४-२-६३-३; अभिषेक नायर ३०-७-१०१-३; विजय गोहिल ८-०-३४-०; विशाल दाभोळकर ९-३-२१-०; सिद्धेश लाड ४-०-१८-०.मुंबई (दुसरा डाव) : अखिल हेरवाडकर झे. गोहेल गो. गजा १६, पृथ्वी शॉ झे. पटेल गो. गजा ४४, श्रेयश अय्यर झे. पटेल गो. गजा ८२, सूर्यकुमार यादव खेळत आहे ४५, आदित्य तरे खेळत आहे १३. अवांतर - ८. एकूण : ६७ षटकांत ३ बाद २०८ धावा.गोलंदाजी : आर. पी. सिंग १४-४-३७-०; रुष कलारिया १३-५-३-०; चिंतन गजा १९-८-५४-३; भार्गव मेराई ५-३-६-०; हार्दिक पटेल १४-०-६६-०; रुजुल भट २-०-९-०.
दुसऱ्या डावात मुंबईची ‘खडूस’ फलंदाजी
By admin | Published: January 13, 2017 1:34 AM