मुंबई : ‘ट्रम्प’ लढतीत निर्णायक बाजी मारताना सिमॉन सँटोसने यजमान मुंबई रॉकेट्स विरुद्ध चेन्नई स्मॅशर्सला विजयी केले. यासह चेन्नईने प्रीमियर बॅडमिंटन लीगमध्ये (पीबीएल) विजयी सलामी दिली. पिछाडीनंतर अखेरच्या ट्रम्प लढतीत सिमॉनने मुंबईच्या गुरुसाईदत्तला नमवून चेन्नईला ४-३ असे विजयी केले. तत्पूर्वी हैदराबाद हंटर्सने चुरशीच्या सामन्यात बंगळुरु टॉपगन्सला ३-२ असा धक्का दिला.वरळीच्या नॅशनल स्पोटर््स क्लब आॅफ इंडिया (एनएससीआय) येथे झालेल्या सामन्यात यजमान मुंबईला दुसऱ्या सामन्यात पराभवाची चव चाखावी लागली. पहिल्याच लढतीत चेन्नईच्या ख्रिस अॅडकॉक - पिआ झेबादिह यांनी कामिला जुहल - व्लादिमीर इवानोव्ह यांना १५-१०, ७-१५, १५-११ असे नमवून चेन्नईला १-० आघाडीवर नेले. पुरुष एकेरीत मुंबईच्या एचएस प्रणयने ब्राईस लेवेरडेझचा १५-८, १५-११ असा पाडाव करुन १-१ बरोबरी साधली.यानंतर ट्रम्प लढतीत मॅथिअस बोए - व्लादिमीर या जोडीने बाजी मारत अॅडकॉक - प्रणव चोप्रा यांना १५-१०, ९-१५, १५-१३ असे पराभूत करुन मुंबईला ३-१ अशा मजबूत आघाडीवर नेले. तर बलाढ्य पीव्ही सिंधूने महिला एकेरीत ली हानचे आव्हान १५-८, ११-१५, १५-८ असे परतावून चेन्नईची पिछाडी २-३ अशी कमी केली. यामुळे निर्णायक ठरलेल्या अखेरच्या पुरुष एकेरीत चेन्नईने बाजी मारली.नेमकी ही लढत ट्रम्प असल्याने चेन्नईच्या सिमॉनने तुफान स्मॅशेस करुन गुरुसाईदत्तला १५-९, १५-१२ असे नमवत संघाला विजयी केले. याआधी स्टार खेळाडू ली चाँग वेई पराभूत झाल्यानंतरही हैदराबादने बाजी मारली. पुरुष दुहेरीची ट्रम्प लढत निर्णायक ठरवताना हैदराबादने विजय मिळवला. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चाँग वेई विरुध्द अपयशी ठरलेल्या के. श्रीकांतने त्याला नमवण्याची कामगिरी केली. सुओ डी हिने सलामीच्या लढतीत बंगळुरुला विजयी केल्यानंतर हैदराबादने पुरुष दुहेरीच्या ट्रम्प लढतीत बाजी मारुन २-१ अशी आघाडी घेतली. यानंतर पी. कश्यपने समीर वर्माचा २-० असा धुव्वा उडवला. ही लढत बंगळुरुची ट्रम्प असल्याने त्यांना फटका बसला आणि हैदराबादने ३-० अशी आघाडी घेतली. यानंतरच्या मिश्र दुहेरी व पुरुष एकेरीत बंगळुरुने विजय मिळवला खरा पण तोपर्यंत उशीर झालेला. (क्रीडा प्रतिनिधी)
मुंबईला चेन्नईच्या ‘स्मॅश’चा दणका
By admin | Published: January 04, 2016 3:03 AM