राजकोट : तमिळनाडूचा पहिला डाव मर्यादित धावसंख्येत रोखल्यानंतर आघाडीच्या फलंदाजांनी मोक्याच्या वेळी कच खल्ल्याने मुंबईची रणजी चषक उपांत्य सामन्यात दुसऱ्या दिवसअखेर ४ बाद १७१ धावा अशी अवस्था झाली. शार्दुल ठाकूर आणि अभिषेक नायर यांच्या अचूक माऱ्यापुढे तमिळनाडूचा पहिला डाव ३०५ धावांमध्ये संपुष्टात आला.
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात तमिळनाडूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आश्वासक सुरुवात केलेल्या तमिळनाडूला शार्दुल आणि नायर यांनी मोक्याच्यावेळी झटके देत त्यांचा डाव मर्यादित रोखला. बाबा इंद्रजित (६४), कौशिक गांधी (५०) व विजय शंकर (५०) यांनी संघाला सावरले.मुंबईने डावाची सुरुवात केली तेव्हा सर्वांची नजर युवा सलामीवीर पृथ्वी शॉकडे होती. एक चौकार मारून पृथ्वीने सर्वांची उत्सुकता वाढवली देखील, मात्र नंतर अश्विन क्रिस्टच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकात तो यष्टिरक्षकाकडे झेल देऊन परतला. पहिल्याच षटकात धक्का बसल्यानंतर मुंबईकरांनी सावध पवित्रा घेतला.
यावेळी तमिळनाडू पकड मिळविणार असे दिसत होते, परंतु प्रफुल वाघेला आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी करून मुंबईला चांगल्या स्थितीत आणले. विजय शंकरने सूर्यकुमारला बाद करून ४३व्या षटकात ही जोडी फोडली. त्याने ११६ चेंडूंत ११ चौकारांसह १ षट्कार ठोकून ७३ धावा केल्या. ४४व्या षटकात वाघेला १३४ चेंडंूत ८ चौकारांसह ४८ धावा काढून धावबाद झाला, तर याच षटकातील अखेरच्या चेंडूवर सिद्धेश लाड भोपळाही न फोडता औशिक श्रीनिवासचा शिकार ठरला.
झटपट ३ बळी गेल्याने मुंबईचा डाव १ बाद १२५ वरून ४ बाद १२८ असा घसरला. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा कर्णधार आदित्य तरे (१९*) व भरवशाचा श्रेयश अय्यर (२४*) खेळत होते. तमिळनाडूकडून अश्विन क्रिस्ट, औशिक श्रीनिवास आणि गंगा श्रीधर राजू यांनी प्रत्येकी एक बळी घेतले.तत्पूर्वी, ६ बाद २६१ धावांवरून पुढे खेळताना तमिळनाडूचा डाव ३०५ धावांत संपुष्टात आला. शार्दुल ठाकूर (४/७५) आणि अभिषेक नायर (४/६६) यांनी अचूक मारा केला. विजय शंकर आपल्या वैयक्तिक धावसंख्येत ९ धावांची भर काढून अर्धशतक झळकावून बाद झाला. यानंतर अश्विन क्रिस्टने (३१) काहीवेळ प्रतिकार केल्याने तामिळनाडूला तीनशेचा टप्पा पार करता आला. संक्षिप्त धावफलकतमिळनाडू (पहिला डाव) : ११५.२ षटकांत सर्वबाद ३०५ धावा (बाबा इंद्रजित ६४, विजय शंकर ५०, कौशिक गांधी ५०; अभिषेक नायर ४/६६, शार्दुल ठाकूर ४/७५) मुंबई (पहिला डाव) : ६० षटकांत ४ बाद १७१ धावा (सूर्यकुमार यादव ७३, प्रफुल वाघेला ४८, आदित्य तरे खेळत आहे १९, श्रेयश अय्यर खेळत आहे २४; विजय शंकर १/१४, औशिक श्रीनिवास १/२२)